...आणि दिलखुलास अशा व्यक्तिमत्वाची भेट झालीच नाही!

By अतुल कुलकर्णी | Published: December 12, 2019 09:00 AM2019-12-12T09:00:51+5:302019-12-12T09:39:37+5:30

'... आणि त्यांनी पाठीवर थाप टाकत, खळाळून हसत दाद दिली. तेव्हापासून आमची मैत्री झाली. ती अगदी ते जाण्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत..'

Gopinath Munde : ... and has never met such a personable! | ...आणि दिलखुलास अशा व्यक्तिमत्वाची भेट झालीच नाही!

...आणि दिलखुलास अशा व्यक्तिमत्वाची भेट झालीच नाही!

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी (वरिष्ठ सहायक संपादक)

माझा आणि गोपीनाथ मुंडे यांचा पहिला परिचय झाला तो विधानसभेच्या गॅलरीत. विरोधकांनी गदारोळ घालून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा वाया घालवला, असे विश्लेषण मी लिहिले होते. ते वाचून मुंडे चांगलेच नाराज झाले होते. विधानसभेच्या लॉबीत आम्ही भेटलो. त्यांनी त्यांची नाराजी दाखवली. मी म्हणालो, जे घडले ते लिहिले. तुम्ही तुमचे म्हणणे सांगा, मी ते लिहितो. त्यावेळी ते म्हणाले, मला काहीही बोलायचे नाही... विषय संपला, मी तेथून बाहेर पडलो. त्याच्या दुस-या दिवशी सभागृहात त्यांनी सत्ताधा-यांना झोडपून काढणारे भाषण केले. ते भाषण आम्ही लोकमतमध्ये जोरदार छापले. मी विधानसभेत गेलो. मुंडेंनी पुन्हा मला लॉबीत बोलावून घेतले आणि जोरात बातमी आलीय, माझी... पाहिली का...? असे मलाच विचारले...! मी म्हणालो, बातमी माझ्या नावासह आहे... आणि त्यांनी पाठीवर थाप टाकत, खळाळून हसत दाद दिली. तेव्हापासून आमची मैत्री झाली. ती अगदी ते जाण्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत.

अत्यंत बिनधास्त आणि धाडसी स्वभाव, आपल्या भाषणातून भल्या भल्यांची फिरकी घेण्याची त्यांची वृत्ती सगळ्यांना कायम मोहात पाडणारी असायची. विधानसभेतल्या त्यांच्या अनेक आठवणी माझ्या कायमच्या स्मरणात आहेत. एकदा विधानसभेत गदारोळ झाला. काँग्रेस, राष्ट्रवादीने गोंधळात कामकाज उरकले. त्यावरुन गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली सभागृहातच आंदोलन करण्याचा निर्णय झाला. कामकाज संपले तरी आम्ही विधानसभेचे सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका भाजपाने घेतली. ‘वेल’मध्ये एका खूर्चीवर मुंडे बसले. एका खूर्चीवर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस बसले. समोर सगळे सदस्य बसले आणि प्रतीविधानसभा भरवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हे चालू होते. वरती पत्रकार कक्षात आम्ही पत्रकार बसून होतो. राज पुरोहित यांनी सगळ्यांना रात्री समोसे, वडे आणले. खाली बसलेल्या मुंडे यांनी तेथूनही वरती पत्रकार गॅलरीत द्या नेऊन, आपल्यामुळे त्यांना उपाशी बसावे लागले आहे, असे सांगितले. ही जाणीव, आपुलकी त्यांच्या स्वभावाचा भाग होती.

मराठवाड्यात गोदापरिक्रमाचे त्यांनी आयोजन केले होते. गोदावरी नदी ज्या ज्या, मार्गाने गेली त्या सगळ्या गावांना त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी मुंबईहून अनेक पत्रकारांना बोलावले होते. मला त्यांनी तू आलेच पाहिजे असा फोन केला. मराठवाड्यात लोकमतची स्वतंत्र आवृत्ती, संपादक, सगळे काही होते, त्यामुळे मी येऊन काय करणार? असे त्यांना म्हणालो, तर त्यांनी मी लिहीण्यासाठी नाही, गोदापरिक्रमा पाहण्यासाठी बोलावतो आहे, असे सांगितले. केशव उपाध्ये मुंबईतून सगळ्यांना पाठवण्याचे नियोजन करत होते. मी, उदय तानपाठक सकाळच्या विमानाने औरंगाबादला गेलो. तेथे आमच्यासाठी एक गाडी आली होती. तेथून आम्ही, त्यांची परिक्रमा ज्या गावात होती तेथे गेलो. गावागावात जाऊन ते सभा घेत होते, लोकांशी बोलत होते. त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना नावानिशी बोलावत होते.

आपला देवच आपल्या भेटीला आला, असे भाव गावागावात त्यांच्या भेटीच्या वेळी आम्ही पहात होतो. एका गावातून दुस-या गावात जाताना त्यांच्या गाडीत मी, उदय आणि पंडीतअण्णा (धनंजय मुंडे यांचे वडील) बसलो. पुढे ड्रायव्हरच्या शेजारी गोपीनाथराव. गाडी सुरु झाली आणि आमच्या गप्पाही... तेवढ्यात पंडीतअण्णांनी जेवणाचा डबा उघडला. एका प्लेटमध्ये भाकरी, चटणी, कोरडे पिठले, भाजी असे वाढून ती प्लेट गोपीनाथरावांच्या हाती दिली. जरा खाऊन घ्या, तुम्ही पण खा असे म्हणत त्यांनी आम्हालाही जेवायला दिले. सांगण्याचा हेतू हाच होता की, तुम्ही आधी जेवण घ्या, नंतर काय ते बोला... त्यादिवशी त्यांच्या चेह-यावरचे गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलचे प्रेमाचे भाव आजही मला काल घडल्यासारखे कायमचे कोरले गेले आहे.

मी लोकमतमध्ये राजकीय सटायर कॉलम लिहायचो. ‘अधून मधून’ असे त्या कॉलमचे नाव. त्यात मी राजकीय नेत्यांवर व्यंगात्मक, टीकात्मक लिखाण करायचो. पुढे त्यातील निवडक लेखांचे संपादन प्रख्यात कवी अशोक नायगावकर यांनी केले. ‘अधून मधून’ या नावाने ते पुस्तक प्रकाशित झाले. असे पुस्तक येताना तुम्ही ज्यांच्यावर सटायर लिखाण करता, त्यांच्याकडून त्यांचे मत लिहून घेण्याची इंग्रजी पुस्तकाच्या जगात पद्धत आहे. त्यामुळे मी त्यांना तुम्ही तुमचे मत लिहून द्या, असे सांगितले. तेव्हा दिलखुलास हसत ते मला म्हणाले, तुम्ही आमच्यावरच टीका करणार, आणि आम्हालाच त्यावर लिहा म्हणून सांगणार... पण मी लिहून देतो असे म्हणत त्यांनी सुंदर प्रतिक्रिया लिहून दिली. ती मी त्या पुस्तकात छापली आहे. शिवाय त्यांचे कार्टूनही पुस्तकाच्या कव्हरवर छापले आहे. दिलखुलास आणि बिनधास्तपणा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती.

प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नींना राज्यसभेची उमेदवारी द्यावी असा विषय सुरु होता. त्याचवेळी अशा काही घटना घडल्या की गोपीनाथ मुंडे चिडले. त्यांनी बंड केले. राज्य भाजपामध्ये खळबळ उडाली. नितीन गडकरी आणि त्यांच्यातील वाद समोर आला होता.  राज्य भाजपमाध्ये सह्यांची मोहीम सुरु झाली होती. मुंडे कोणाशीही बोलायला तयार नव्हते. लोकमतमधून मला आणि माझ्या सहकारी मॅडमना फोन आला. आम्हाला त्यांची स्पेशल मुलाखत हवी होती. मला मुलाखत हवी म्हणून विधानभवनात त्यांच्या मागेच लागलो. ते म्हणाले, कोणालाही न कळू देता माझ्या गाडीत जाऊन बैस. मी चुपचाप बाहेर त्यांच्या गाडीत जाऊन मागच्या बाजूला बसलो. थोड्यावेळाने तेथे आले आणि विधानभवनातून ते वरळी नाक्यावर येईपर्यंत मी त्यांच्याशी बोलून एक्सक्ल्यूझिव मुलाखत घेतली. त्यादिवशी त्यांची मुलाखत फक्त आणि फक्त लोकमतमध्येच छापून आली होती. दुस-या दिवशी भेटल्यावर मला ते म्हणाले, मुलाखत तुला मिळाली पण मला सगळ्या पत्रकारांनी भंडावून सोडले त्याचे काय..? एखाद्यावर प्रेम केले की ते इतरांशी भांडणं घ्यायलाही कमी करायचे नाहीत.

नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. ते केंद्रात मंत्री म्हणून गेले. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणे बाकी होते. टीव्ही नाईन या चॅनलवर राजकीय चर्चेत मी आणि सुधीर मुनगंटीवार सहभागी होतो. त्यावेळी मी विरोधकांवर टीका केली होती. पण चर्चा संपल्यानंतर मी आणि मुनगंटीवार दोघे एकाच गाडीतून वरळीच्या कॉफीशॉपवर कॉफी घ्यायला गेलो. तेथे मी त्यांना म्हणालो होतो, आता राज्यातही तुमचे सरकार येणार, आणि तुम्ही मंत्री होणार... त्यावर मुनगंटीवार म्हणाले होते, मला ते शक्य वाटत नाही. त्यावर आमची पैज लागली होती, जर तुमचे सरकार आले आणि तुम्ही मंत्री झालात तर आपण याच कॉफी शॉपवर कॉफी प्यायला येऊ, त्याचे बील तुम्ही द्यायचे. पुढे भाजप शिवसेनेचे सरकार आले आणि गेलेही पण मुनगंटीवार यांनी मला काही कॉफी पाजलीच नाही... असो विषय तो नाहीच. त्या चर्चेत मी विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही, असे म्हणत टीका केली होती.

ती चर्चा दिल्लीत गोपीनाथ मुंडे पाहत होते. त्यांनी चर्चा संपल्यानंतर एकनाथ खडसे यांना फोन केला आणि म्हणाले, अतुल नाराज दिसतोय... त्याच्याशी बोला... मी दिल्लीहून आलो की त्याला तुमच्याकडे बोलवा. आपण त्याच्याशी बोलू... त्याच रात्री खडसेंचा मला फोन करुन हे सगळे सांगितले. त्यांच्यासोबत पाशा पटेल त्या घटनेचे साक्षीदार होते. त्यांनीही मला ती गोष्ट सांगितली. मात्र नंतर त्यांच्या निधनाचीच बातमी आली... मन सुन्न झाले होते. आजही केशवऽऽऽ अशी अनुनासिक आवाजात ते हाक मारतील असे वाटत रहाते... आज ते नाहीत, पण त्यांनी जोडलेल्या माझ्यासारख्या असंख्य पत्रकारांकडे त्यांच्या कितीतरी आठवणी ताज्या आहेत...! गोपीनाथराव मुंडे यांना माझी व माझ्या परिवाराची विनम्र आदरांजली...!!!

Web Title: Gopinath Munde : ... and has never met such a personable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.