राज्याच्या राजकारणात येणार गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान; पंकजा मुंडे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 03:26 PM2019-12-12T15:26:38+5:302019-12-12T15:26:55+5:30
पंकजा मुंडे यांच्या संघर्षात भाजप असले की नसेल हे जरी निश्चित नसले तरी राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असणार हे नक्की.
मुंबई - भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष बीडकडे लागले होते. पंकजा यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत भाजप सोडणार नाहीच, पण कोणतही पद न घेता समांतर यंत्रणा उभा करण्याचा आपला इरादा असल्याचे बोलून दाखवले. तशी घोषणाही त्यांनी केली. आगामी काळात राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना उदयाला येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणेच आपल्याला संघर्ष करायचा आहे. विरोधाची भूमिका आपल्या 'डीएनए'त असल्याचं सांगताना त्यांनी पक्षाला एकप्रकारे संदेश दिला आहे. 2014 पूर्वी ज्या प्रमाणे संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. तशीच यात्रा आता पुन्हा काढणार असून राज्यातील दीन दुबळ्या, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे पंकजा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात आपल्याकडे आमदारकी, खासदारकी, विरोधीपक्षनेतेपद नसणार, असे सांगताना त्यांनी आपल्याला भाजपच्या कोर कमिटीतून मुक्त करण्याची विनंती पक्षाकडे केली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या संघर्षात भाजप असले की नसेल हे जरी निश्चित नसले तरी राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान असणार हे नक्की.