गोपीनाथ मुंडे तारीख बदलणारे नव्हे तर इतिहास घडवणारे नेते - मुख्यमंत्री
By Admin | Published: February 11, 2017 03:45 PM2017-02-11T15:45:11+5:302017-02-11T18:58:50+5:30
मुंडेसाहेब तारीख बदलणारे नव्हते, इतिहास बदलणारे होते असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा दावा फेटाळून लावला आहे.
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 11 - 'मुंडेसाहेब तारीख बदलणारे नव्हते, इतिहास बदलणारे होते', असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचा दावा फेटाळून लावला आहे. 'गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबर नाही, पवारांचं वलय पाहून तारीख त्यांनी ठरवली', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केला होता. 'गोपीनाथ मुंडेंना आपला मूळ वाढदिवस माहित नव्हता, अशी माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिली', असंही अजित पवार यांनी सांगितलं होतं. एबीपी माझा कट्टावर बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला होता.
'गोपीनाथ मुंडेसाहेब तारीख बदलणारे नव्हते, इतिहास बदलणारे होते. राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. गोपीनाथ मुंडेंचा अपमान कदापि सहन करणार नाही', अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे. बीडमध्ये बोलत असताना त्यांनी अजित पवारांवर ही टीका केली.
इतकंच नाही तर गोपीनाथ मुंडे पंकजा आणि चार आमदारांसोबत भाजपा सोडण्याच्या तयारीत होते असाही गौप्यस्फोट अजित पवारांनी केला होता. 'गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या विचारात होते, मात्र सुषमा स्वराज यांनी थांबवलं', असं अजित पवार बोलले . 'तसंच ज्यावेळी धनंजय मुंडे पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या विचारात होते तेव्हा काही घटना घडतात, मुंडेंना सोडू नका, असा सल्ला मीच धनंजय मुंडेंना दिला होता', असंही अजित पवार बोलले.