गोपीनाथ मुंडे रुसले, मनधरणीची पाळी
By admin | Published: May 15, 2014 02:09 AM2014-05-15T02:09:05+5:302014-05-15T02:09:05+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. गोपीनाथ मुंडे बुधवारी पुन्हा रुसले. या रुसव्यापायी ते पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीलाच जाणार नाहीत, असे वृत्त धडकल्यानंतर धावपळ उडाली.
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते खा. गोपीनाथ मुंडे बुधवारी पुन्हा रुसले. या रुसव्यापायी ते पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीलाच जाणार नाहीत, असे वृत्त धडकल्यानंतर धावपळ उडाली. शेवटी दोन दूतांकरवी ती दूर करण्यात आली आणि ते बैठकीला आले. या बैठकीचे जे आमंत्रण प्रसिद्धी माध्यमांना पाठविण्यात आले त्यात मुंडे यांचे नाव नव्हते. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये पक्षाने आपल्याला बाजूला ठेवल्याची मुंडेंची भावना असल्याने ही नाराजी असल्याचे म्हटले जाते. प्रदेश कार्यकारिणीची बैठक बुधवारी वसंत स्मृती या मुंबई भाजपाच्या कार्यालयात झाली. बैठक सकाळी सुरू होताच मुंडेंच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर आणि आ. गिरीश महाजन यांना मुंडे यांच्या घरी पाठविले. या दोघांनी शिष्टाई करीत मुंडे यांचे मन वळविले व त्यांना बैठकस्थळी आणले. मुंडे यांनी समारोपाचे भाषणही दिले. नंतर पत्रपरिषदेत माइक आपल्याकडे न घेता फडणवीस यांनी मुंडेच संबोधित करतील, असे सांगून त्यांना मोठेपण दिले. नाराजीबाबत पत्रकारांनी विचारले असता मुंडे म्हणाले की, मी नाराज नव्हतो. फुंडकर, महाजन आपल्याकडे बैठकीला नेण्यासाठी आले. त्यामुळे आपला पक्षातील सन्मानच वाढला आहे. (विशेष प्रतिनिधी)