गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 01:54 PM2024-05-12T13:54:08+5:302024-05-12T13:54:49+5:30
संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
मुंबई - १९९९ साली राज्यात भाजपा-शिवसेना युतीचं सरकार आलं असतं, परंतु मुख्यमंत्रिपदाच्या वादातून ती सत्ता गेली. मुख्यमंत्रिपदाची लालसा तेव्हाही त्यांच्या मनात होती. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा त्याला विरोध होता असं विधान शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या एकमेकांमधील सुसंवादामुळे १९९५ ची सत्ता चालली, परंतु ९९ ला आपल्या हाती सत्ता येतेय, परंतु मुख्यमंत्री कोण या वादातून आलेली सत्ता गमावली. कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते ते उद्धव ठाकरेंना सहन झालं नव्हते. मुंडेना मुख्यमंत्री करा असं अनेक आमदारांनी सांगितले होते. परंत तेव्हाही यांच्या मनात मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होती. याला शिवसेनाप्रमुखांचा विरोध होता. अपक्ष आमदारांची जुळवाजुळव ही गोपीनाथ मुंडे यांनी केली. मनोहर जोशी, नारायण राणे यांनीही आमदारांची जुळवाजुळव प्रयत्न केला, त्याला छेद उद्धव ठाकरेंना दिला असं त्यांनी म्हटलं.
तर एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना सांभाळतात, संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघात वसूली करून मातोश्रीकडे पैसे घेऊन जातायेत. हे कुठल्याही उमेदवाराला विचारले तरी ते सांगतील. तुम्ही इनकमिंगवाले, आम्ही आऊटगोईंगवाले आहोत. कार्यकर्त्यांना मदत करण्याऐवजी त्याचे खच्चीकरण करण्याचं काम केले जाते. संजय राऊतांचे अस्तित्व संपले, एकही विधान असं दाखवा जे खरे ठरलेय, राऊत जे बोलतो ते होत नाही. महायुती प्रचंड मताने जास्त जागा विजयी होणार आहे. मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले तीच भूमिका आमची आहे. मविआचे जे नेते औरंगजेबाचा उदोउदो करतायेत त्यांचा कळस कापण्याची ही वेळ आहे. महायुती मविआच्या या प्रकाराला उत्तर देईल असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला.
दरम्यान, सुपारीबहाद्दर लोकांनी राजकारणावर बोलू नये. देवेंद्र फडणवीसांना जे राजकारणात स्थान आहे त्यावर बिनडोक संजय राऊतांनी बोलू नये. पक्ष मजबूत कसा करतायेत हे फडणवीसांकडे बघून कळते. पक्षाची इज्जत कशी घालवायची हे तुमच्याकडे बघून कळते. इज्जत घालवणाऱ्या माणसाने अशी वक्तव्ये करणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात आहेत. १७ तारखेला मविआ नेत्यांची अखेरची घरघर संपेल असं सांगत शिरसाटांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
न्यायालयावर अविश्वास दाखवणं म्हणजे हे लोकशाही मानत नाहीत
सुप्रीम कोर्टावर दबाव मग केजरीवालांना जामीन कसा मिळाली? जामिनावर बाहेर आल्यावर ते सत्तेविरोधातच बोलत आहेत. लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे हे लोक आहेत. केजरीवाल जामिनावर बाहेर आले. राजकारण हा भाग वेगळा आहे. न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. न्यायालयावर अविश्वास दाखवणे म्हणजे तुम्ही या लोकशाहीला मानत नाही हे होते असा टोला शिरसाट यांनी विरोधकांना लगावला.
एकनाथ शिंदे कार्यकर्ता जपणारा माणूस
कार्यकर्त्यांना कसं जपायचं हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला शिकवलं, त्यामुळे नाशिकच नव्हे तर सर्वच मतदारसंघात मुख्यमंत्री गेले आहेत. प्रत्येक मतदारसंघात किमान २ वेळा ते गेलेत. सभा रद्द केल्या नाहीत. त्यांचीही तब्येत ठीक नसताना ते फिरतायेत. आमचा मुख्यमंत्री कार्यकर्ता जपतोय याचा आम्हाला अभिमान आहे असंही संजय शिरसाट यांनी सांगितले.