गोपीनाथ मुंडे संस्थेला वाटाण्याच्या अक्षता
By admin | Published: March 22, 2016 04:08 AM2016-03-22T04:08:36+5:302016-03-22T04:08:36+5:30
मराठवाड्याचे सुपुत्र आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही
नजीर शेख, औरंगाबाद
मराठवाड्याचे सुपुत्र आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या प्रस्तावित ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपरोक्त प्रस्तावाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत.
विद्यापीठात मुंडे यांच्या नावाचे अध्यासन केंद्र असावे, अशी मागणी पुढे आली होती. विद्यापीठाच्या २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातही त्यासंबंधी सूतोवाच करण्यात आले होते. अध्यासन केंद्राऐवजी मुंडे यांच्या नावाने विद्यापीठाच्या परिसरात शंभर एकर जागेमध्ये ग्रामविकास व संशोधन संस्था स्थापन करावी, असा विचार प्रशासनाने मांडला. त्यानुसार अडीच लाख रुपये खर्चून प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्पाच्या पूर्व बैठकांसाठी औरंगाबादेत आल्यानंतर त्यांच्यासमोर प्रस्तावाचे सादरीकरण झाले. बैठकीला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.
विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे, समितीमधील डॉ. सर्जेराव ठोंबरे, गजानन सानप आदींनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. मुख्यमंत्र्यांनीही विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले होते.