गोपीनाथ मुंडे यांचे कार्य अविस्मरणीय - दानवे
By admin | Published: June 4, 2016 03:34 AM2016-06-04T03:34:50+5:302016-06-04T03:34:50+5:30
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुुंडे यांनी कायम कार्यकर्त्यांना सन्मान दिला. त्यांचे राजकीय संस्कार आपल्यावरही आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले.
परळी (बीड) : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुुंडे यांनी कायम कार्यकर्त्यांना सन्मान दिला. त्यांचे राजकीय संस्कार आपल्यावरही आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी केले. मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताहालाही प्रारंभ झाला.
पांगरी येथील गोपीनाथगडावर गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोपीनाथगडावर हजारोंचा नाथसागर उसळला होता. याप्रसंगी अपंगांना साहित्याचे वाटप, पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ, ई-हेल्थ सेवा आदी कार्यक्रमांचा प्रारंभ झाला.
प्रज्ञा गोपीनाथ मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, अमित पालवे, गौरव खाडे, केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंंग ठाकूर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्यमंत्री राम शिंंदे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, रासपचे अध्यक्ष आ. महादेव जानकर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी समाधीस्थळी जाऊन गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. गोपीनाथ मुंडेंना पंकजा मुंडे यांच्या रुपाने उभा महाराष्ट्र पाहत आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे सूचक वक्तव्यही यावेळी दानवे यांनी केले. गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यांना सत्तेत बसविण्याचे काम केले आहे. ते नेते तर होते; पण दातेही होते, असे सांगून, गोपीनाथगडाच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.बीड जिल्ह्यात सलग तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर्षीही खरीप व रबी हंगाम वाया गेला. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ९०० कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करून दिल्याबद्दल पंकजा मुंडे यांचा खासदार व आमदारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.रावसाहेब दानवे यांनी गेल्या ३५ वर्षांत गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासातील आठवणींचा पट उलगडला. गोपीनाथ मुंडेंना पंकजा मुंडे यांच्या रुपाने उभा महाराष्ट्र पाहत आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
विचार ज्योतचे आगमन
देऊळगाव, सिंंदखेड राजा जि. बुलढाणा येथून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा घेऊन विचारज्योत लोकनेताचार्य ही पायी दिंंडी गोपीनाथगड स्थळावर आली. या दिंंडीत मोठ्या संख्येने त्यांचे चाहते सहभागी झाले होते. या विचारज्योतीने उपस्थितांचे लक्ष वेधले.