गोरेगावजवळ रुळाला तडा
By admin | Published: March 4, 2017 05:45 AM2017-03-04T05:45:34+5:302017-03-04T05:45:34+5:30
रुळावरून मालगाडी घसरल्याने १६ तास हार्बर सेवा ठप्प झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
मुंबई : रुळावरून मालगाडी घसरल्याने १६ तास हार्बर सेवा ठप्प झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वेची सेवाही रुळाला तडा गेल्याने दीड तास विस्कळीत झाली आणि ऐन गर्दीच्या वेळी सेवेचा पुरता बोजवारा उडाला. गोरेगाव ते मालाड स्थानकाजवळ घडलेल्या घटनेमुळे २२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या.
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते मालाड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर रुळाला तडा गेला. सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे बोरीवली, विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला. त्याची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. तोपर्यंत ज्या स्थानका दरम्यान रुळाला तडा गेला त्या डाऊन मार्गावर लोकलच्या रांगाच लागल्या.
जवळपास तीन धीम्या लोकल या एकामागोमाग एक उभ्याच होत्या. डाऊन धीम्या मार्गावर घटना घडल्याने या मार्गावरील लोकल गोरेगाव ते मालाड दरम्यान जलद मार्गावरुन वळवण्यात आल्या. त्याचा परिणाम जलद लोकल फेऱ्यांवरही झाला आणि धीम्या व जलद लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावू लागल्या. यामुळे अंधेरी ते बोरीवली स्थानकांवरील धीम्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची एकच गर्दी उसळली. दरम्यान, रुळांच्या दुरुस्तीचे काम हे दीड तासांत पूर्ण केले आणि त्यानंतर लोकल सेवा पुर्ववत करण्यात आली. परंतु लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने दुपारी बारा वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर लोकलचा गोंधळ दिसून येत होता. (प्रतिनिधी)