गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच दिला बेदम चोप

By Admin | Published: July 14, 2017 06:07 AM2017-07-14T06:07:44+5:302017-07-14T06:07:44+5:30

कथित गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीचीही मोडतोड केल्याची घटना नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथे बुधवारी सकाळी घडली.

Gorkhara gave BJP worker a breathtaking tip | गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच दिला बेदम चोप

गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच दिला बेदम चोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोमांस विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून कथित गोरक्षकांनी भाजपा कार्यकर्त्यालाच बेदम मारहाण करून त्याच्या दुचाकीचीही मोडतोड केल्याची घटना नरखेड तालुक्यातील भारसिंगी येथे बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा चौघांना अटक केली.
सलीम इस्माईल शहा (३२) असे या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. काही दिवसांपासून तो गोमांसाची चोरून विक्री करीत असल्याचा काही जणांना संशय होता. बुधवारी सकाळी दुचाकीवरून तो जलालखेड्याहून भारसिंगी मार्गे काटोलकडे जात असताना काही तरुणांनी त्याला भारसिंगी बसथांब्याजवळ अडविले. त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात काही पिशव्यांमध्ये मांस आढळले. हे गोमांस नसून बैलाचे मांस असल्याचे सलीम सांगत होता. मात्र, या कथित गोरक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष करून सलीमला बेदम मारहाण केली.
या मारहाणीत सलीम गंभीर जखमी झाला. पोलिसांनी जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्याला लगेच नागपुरातील मेयो रुग्णालयात पाठविले. गुरुवारी दुपारी त्याला रुग्णालयातून सुटी दिली. पोलिसांनी सलीमकडून १२०० रुपये किमतीचे मांस आणि ४८ हजार रुपयांची अ‍ॅक्टिव्हा जप्त केली. उलटसुलट आरोपांमुळे जलालखेडा पोलिसांनी सलीमविरुद्ध गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला तर, त्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी मोरेश्वर तांदूळकर (३०), जगदीश चौधरी (२८), अश्विन उईके (२६) व रामेश्वर तायवाडे (२७) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जलालखेडा पोलिसांनी जिल्हा पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवून घेतली.
सलीम याला गोरक्षणाच्या नावावर बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा भाजपाने निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी यासंबंधी एक पत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या घटनेशी भाजपाचा कुठलाही संबंध नाही. सलीम शाह हा भाजपा कार्यकर्ता आहे. स्वत:ला गोरक्षक म्हणवून घेणाऱ्या कथित गोरक्षकांनी केलेले कृत्य संतापजनक आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोरेश्वर तांदूळकर याचा समावेश आहे. मोरेश्वर प्रहार संघटनेचा नरखेड तालुका प्रमुख आहे. चारही आरोपींना पोलिसांनी गुरुवारी काटोल येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Web Title: Gorkhara gave BJP worker a breathtaking tip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.