सरकारचे कामकाज संघाच्या इशाऱ्यांवर
By admin | Published: September 25, 2015 03:26 AM2015-09-25T03:26:49+5:302015-09-25T03:26:49+5:30
केंद्र व राज्य सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यांवर काम करत आहे. संघाला देशात आपला ‘अजेंडा’ लागू करायचा आहे. आरक्षणाच्या समीक्षेबाबत सरसंघचालकांचे वक्तव्य हे त्याचेच निदर्शक आहे
नागपूर : केंद्र व राज्य सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यांवर काम करत आहे. संघाला देशात आपला ‘अजेंडा’ लागू करायचा आहे. आरक्षणाच्या समीक्षेबाबत सरसंघचालकांचे वक्तव्य हे त्याचेच निदर्शक आहे. ही चिंतेची बाब असून, भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाचे हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी संघ तसेच केंद्रातील नेतृत्वावर टीका केली.
राष्ट्रवादीचा विदर्भस्तरीय मेळावा गुरुवारी येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत सहभागाचा संशय असलेल्या एका विशिष्ट विचारधारेची संघटना उघडपणे जहाल वक्तव्य करीत आहे. तरीदेखील शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. उलट, या विचारसरणीला खतपाणी घालण्याचे काम करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले. तसेच दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी संविधानाने आरक्षण प्रदान केले आहे. सरसंघचालकांना त्यात समीक्षा का अपेक्षित आहे? त्यांना आरक्षण बंद करायचे आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
च्पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक बाण सोडले. शेतकऱ्यांच्या समस्या पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण प्रथम ते कोणत्या देशात आहेत याचा शोध घ्यावा लागेल, असा चिमटा त्यांनी काढला. मोदी सरकारचे फक्त मार्केटिंग चांगले आहे, अशी टीका करीत ‘अच्छे दिनचं घोडं नेमकं कुठं अडलं’ ही मोदींना सवाल करणारी कविताही पवारांनी मेळाव्यात वाचली.