गिरणी कामगारास घर देण्यास शासन कटिबद्ध- मुख्यमंत्री
By admin | Published: May 9, 2016 06:53 PM2016-05-09T18:53:18+5:302016-05-09T18:57:03+5:30
गिरणी कामगारांच्या घर मिळविण्याच्या प्रयत्नांना साथ देत आज म्हाडातर्फे दुसऱ्या टप्प्यात 2634 गिरणी कामगारांसाठी लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात आली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 : गिरणी कामगारांच्या घर मिळविण्याच्या प्रयत्नांना साथ देत आज म्हाडातर्फे दुसऱ्या टप्प्यात 2634 गिरणी कामगारांसाठी लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात आली. शेवटच्या गिरणी कामगारास घर मिळवून देण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल, स्वान मिल, ज्युबिली मिल आदी ठिकाणी उभारण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या सदनिकांची संगणकीय सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार पूनम महाजन, आमदार ॲड. आशिष शेलार, गृह विभागाचे प्रधान सचिव श्री कान्त सिंह, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. झेंडे तसेच म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी, आदी यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, आजचा दिन ऐतिहासिक असून, शासनाने दिलेल्या वचनाची पूर्ती झाली आहे. या सोडतीत ज्यांना घरे मिळाली नाहीत त्यांनाही घरे दिली जातील आणि पुढील तीन वर्षांत एकूण अडीच लाख घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय नवीन विकास आराखड्यातील परवडणारी घरे या योजनेतील घरेही गिरणी कामगारांना दिली जातील. प्रकाश मेहता म्हणाले की, मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध प्रकल्पांतील 970 घरांची सोडत जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल आणि ह्यएमएमआरडीएह्णकडून 2418 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत ऑगस्टमध्ये काढली जाईल.