उर्दू संवर्धनासाठी शासन कटिबद्ध !
By admin | Published: March 26, 2016 01:52 AM2016-03-26T01:52:08+5:302016-03-26T01:52:08+5:30
मालेगाव येथे ‘उर्दू घर’ हा इ-लायब्ररी प्रकल्प राज्य शासनाने सुरू केला असून, यासारख्या विविध योजनांच्या माध्यमांतून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी
मुंबई : मालेगाव येथे ‘उर्दू घर’ हा इ-लायब्ररी प्रकल्प राज्य शासनाने सुरू केला असून, यासारख्या विविध योजनांच्या माध्यमांतून अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. उर्दू साहित्य अकादमीच्या वतीने उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण सभागृह येथे महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीतर्फे २०१४साठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न झाला. त्या वेळी खडसे बोलत होते. अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री दिलीप कांबळे, महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष अब्दुल रउफ खान, आमदार संजय सावकारे, विधान परिषद सदस्या हुस्नबानू खलिफे आदी या वेळी उपस्थित होते.
याप्रसंगी खडसे म्हणाले, उर्दूच्या प्रसारासाठी राज्य शासन ‘उर्दू घर’सारखे प्रकल्प राबवित आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी चालू अर्थसंकल्पात ४०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी राज्यात ३१ वसतिगृहे बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यापैकी ५ वसतिगृहे कार्यान्वित झाली असून, उर्वरित वसतिगृहांचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीतर्फे संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पुरस्कार डॉ.पं.आनंद मोहन जुतशी उर्फ गुलजार दहेलवी (नवी दिल्ली) यांना खडसे यांच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी अकादमीच्या सन २०१६ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात
आले. (प्रतिनिधी)
वलिदक्नी राष्ट्रीय पुरस्कार : मुकीम असर बियावली, सिराज औरंगाबादी राष्ट्रीय पुरस्कार : अब्दुल रहिम नश्तर, सेतू माधवराव पगडी मराठी उर्दू अनुवाद पुरस्कार : डॉ. अक्षयकुमार काळे, साहिर लुधयानवी नवलेखक पुरस्कार : रईस सहरी, हारुन रशीद पत्रकारिता पुरस्कार : शोएब खुसरो (औरंगाबाद टाइम्स ), सलिम अहमद (एशिया एक्स्प्रेस), एजाज अहमद अन्सारी (यू.एन.आय.), निजामुद्दीन अन्सारी (तहरीक-ए-इस्लाह), ले आऊट डिझायनिंग पुरस्कार : कामील शेख.
विशेष पुरस्कार : डॉ. अब्दुल मजीद पारेख, सफदर एच. करमाली, इक्बाल मेमन, फरीद शेख, अब्दुल करीम सालार, हमीदा भिवंडीवाला, हेमंत तातीया, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, कृष्णप्रकाश, मरीयम आसिफ सिद्दिकी.