मराठा आरक्षणाबाबत शासन अनुकूल
By admin | Published: February 20, 2016 03:10 AM2016-02-20T03:10:31+5:302016-02-20T03:10:31+5:30
राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे आहे. याबाबत न्यायालयात पुरेपूर बाजू मांडण्यात येईल, मराठा समाजातील वंचितांना जरूर आरक्षण देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले
लेण्याद्री (पुणे) : राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचे आहे. याबाबत न्यायालयात पुरेपूर बाजू मांडण्यात येईल, मराठा समाजातील वंचितांना जरूर आरक्षण देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी केले.
फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री राम शिंदे, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार सुभाष देशमुख आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, शिवरायांची स्मारके असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. पुरातत्त्व विभागाशी बोलून त्यातील अडसर दूर करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. शिवरायांचे प्रमुख ५ किल्ले ‘मॉडेल फोर्ट’ म्हणून विकसित करण्यात येतील. शिवजयंतीला शिवनेरीवर पास असल्याशिवाय येऊ देत नाहीत, ही शिवप्रेमींची तक्रार असल्याने, याबाबत पुढील वर्षापासून सुलभतेने शिवप्रेमींना गडावर येता येईल, अशी सोय करण्यात येईल. किल्ले शिवनेरीची गडदेवता असलेल्या शिवाईदेवीची पूजा तसेच अभिषेक विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते व प्रांताधिकारी कल्याण पांढरे व तहसीलदार आशा होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर शिवाईदेवी मंदिर ते शिवजन्मस्थळापर्यंत शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)