संप फोडण्याचा सरकारचा डाव

By Admin | Published: June 3, 2017 03:34 AM2017-06-03T03:34:28+5:302017-06-03T03:34:28+5:30

अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच

The government | संप फोडण्याचा सरकारचा डाव

संप फोडण्याचा सरकारचा डाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच शेतकरी संपावर गेला आहे. आता या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. त्यामुळे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऐक्य टिकवून आंदोलन कायम ठेवावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. मात्र, रस्त्यावर दूध ओतून, भाजीपाला व फळे टाकून निषेध करण्याऐवजी अन्य प्रकारे आंदोलन पुढे चालवावे. शेतमालाची नासाडी न करता गावातील गरीब घटकांना त्याचे वाटप करावे
आणि गावातील सामान्य लोकांशी आपली नाळ भक्कम करावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसणे हे देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व, पण सरकारच्या दृष्टीने नामुष्कीची घटना आहे. एकीकडे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने कर्जमाफी दिली; परंतु महाराष्ट्रातील भाजपा सरकार हाच न्याय येथील शेतकऱ्यांना लागू करत नाही. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही पवार यांनी केली.
शेतकऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची वाट न पाहता, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे...
शेतकरी संपामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असताना, मुख्यमंत्री मात्र, विरोधकांवर बेछूट आरोप करत आहेत. शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी लगावला. शेतकऱ्याला जगवायचे असेल, तर कर्जमाफीशिवाय पर्याय नाही, असेही खा. चव्हाण म्हणाले.

Web Title: The government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.