सरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:19 PM2019-08-20T18:19:53+5:302019-08-20T18:23:53+5:30

सौरभ मित्र मंडळाने पूरग्रस्तांसाठी बजावले कर्तव्य

Government assistance has not yet reached the flood affected students of Ichalkaranji, but saurabh mitra mandal from mumabi help them | सरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात

सरकारी मदत अद्याप न पोहोचलेल्या इचलकरंजीतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मदतीचा हात

Next

मुंबई : सांगली-कोल्हापूर जिल्ह्यावर कोसळलेल्या संकटानंतर त्यांना आधार देण्यासाठी अवघा महाराष्ट्र एकवटला. गरीब असो किंवा श्रीमंत, लहान असो किंवा मोठा सारेच मदतीला धावले. पण प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाने आपली सामाजिक बांधिलकी जपताना पूरग्रस्तांना मदत नव्हे तर आपले कर्तव्य समजून मदतीचा आधार दिला. एवढेच नव्हे तर मंडळाच्या आवाहनानंतर प्रभादेवीतील कामगार नगर नं. 2 मधील शाळकरी विद्यार्थ्यांनी पूरात वह्या-पुस्तके गमावलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या दप्तरातील कोऱ्या वह्या देऊन मदतीचा अनोखा आधार दिला. नगरातील शेकडो विद्यार्थ्यांनी वह्या आणि पेन दिल्यामुळे कोल्हापूरच्याइचलकरंजीतील ताकवडे भागातील शेतमजूरांच्या शेकडो मुलांना शालेय वस्तू देता आल्या. सौरभच्या या कर्तव्याचे इचलकरंजीच्या स्थानिक नागरिकांनी मनापासून आभार मानले.

पूरात अडकलेल्या कुटुंबांना मदतीचा आधार देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सौरभ मित्र मंडळाने यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करीत पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले. सौरभकडून आवाहन करताच नगरातील अनेक स्थानिकांनी मदतीचा हात दिला. काहींनी चादर, काहींनी ब्लँकेट दिल्या. महिलांसाठी उपयोगी गोष्टी गरज समजून काही महिलांनी अंर्तवस्त्र आणि पॅड दिले. स्वच्छतेसाठी लागणाऱया गोष्टी, खाद्यपदार्थ, तांदूळ, गव्हाचे पीठ, कडधान्य, साखरही मोठ्या संख्येने देण्यात आले. पूरामुळे शालेय विद्यार्थ्यांचेही फार मोठे नुकसान झाल्याची कल्पना असल्यामुळे नगरातील शाळकऱयांनीच पुढाकार घेऊन हजारो वह्या गोळा केल्या आणि प्रत्येकी सहा असे त्यांचे पॅकिंगही केले. विद्यार्थ्यांच्या आवाहनला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या दप्तरातीलच कोऱ्या वह्या दिल्या. काहींनी दुकानातून डझनभर वह्या आणून दिल्या तर काहींनी रोख पैसे दिले.

पूरग्रस्तांना मोठ्या संख्येने अवघ्या महाराष्ट्रातून मदत केली जातेय, मात्र ती तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचे प्रसारमाध्यमांकडून कळत असल्यामुळे मंडळाने कोल्हापूरच्या पाच गावांची पाहणी केल्यानंतर इचलकरंजीच्या ताकवडेजवळील शेतमजूरांची वस्ती असलेल्या पी.बी. मळा या पुरग्रस्त भागाची निवड केली. एवढेच नव्हे तर वितरणात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून त्या वस्तीतील सर्व कुटुंबप्रमुखांच्या नावांची नोंद करीत प्रत्येकाच्या घरात जाऊन वस्तूंचे वितरण केले. त्यामुळे वितरणाला पूरग्रस्तांकडून पूर्ण सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे या भागात कोणतीही सरकारी मदत पोहोचली नसताना मंडळाने घरोघरी जाऊन पूरग्रस्तांना मदतीचा आधार दिला.

Web Title: Government assistance has not yet reached the flood affected students of Ichalkaranji, but saurabh mitra mandal from mumabi help them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.