अंध शाळांच्या मागे शासन खंबीर उभे राहील - दिलीप कांबळे
By admin | Published: April 11, 2016 12:25 AM2016-04-11T00:25:18+5:302016-04-11T00:25:18+5:30
‘दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांच्या पाठीशी शासन खंबीर उभे राहील,’’ अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.
पुणे : ‘‘दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांच्या पाठीशी शासन खंबीर उभे राहील,’’ अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. अंध मुलींच्या शिक्षणासाठी ‘नॅशनल फेडरेशन आॅफ द ब्लाईंड महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने आळंदी येथे उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या अत्याधुनिक प्रशालेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार अनु आगा, थरमॅक्सच्या अध्यक्षा मेहेर पदमजी, व्होक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एॅन्ड्रीस लॉरमन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये काही कमतरता आहे असे वाटू न देता मेहनत घ्यावी, मेहनतीतून मिळालेले फळ गोड असते. शासनाला या शाळांच्या अडचणीची कल्पना आहे, म्हणून आम्ही शाळांच्या पाठीशी खंबीर उभे राहू. जागृती शाळेला एकूण २०० विद्यार्थ्यासाठी अनुदानित तुकड्यांची परवानगी विशेष बाब म्हणून महिनाभरात मिळवून देऊ़’’
मेहेर पद्मजी म्हणाल्या, ‘‘दृष्टीहीन विद्यार्थिनींची जिद्द पाहता त्यांच्यातूनही यशस्वी उद्योजक तयार होतील.’’ अनु आगा म्हणाल्या, ‘‘देशात मुलींच्या बाबतीत भेदभाव होतो, ही चांगली बाब नाही़ शिक्षणाने भेदभाव, इतर वाईट गोष्टी दूर होतील. समाजाने दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदान करण्याबाबत जागृती केली पाहिजे.’’
संस्थेचे अध्यक्ष एम. वाय. गुरव यांनी अध्यक्षीय भाषण केले. सरचिटणीस वसंत हेगडे, रघुनाथ बरड, माजी आमदार मोहन जोशी, संस्थेचे सल्लागार विजय मेहता यांची भाषणे झाली. प्रवक्ता सकीना बेदी, टेक महिंद्रा फाऊंडेशनचे विजय वावरे, प्राचार्य मंगला वानखेडे, सरपंच सचिन घोलप, जी.एम. मगर उपस्थित होते. किशोर गोहिल यांनी सूत्रसंचालन केले. १९८९ पासून जागृती अंध मुलींची शाळा सुरू असून, ब्रेल प्रेसपासून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम आहे. माजी विद्याथिर्नी सॉफ्टवेअर इंडस्ट्रि, बँका, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, अशी माहिती नॅशनल फेडरेशन आॅफ द ब्लाईंड महाराष्ट्रच्या प्रवक्ता सकीना बेदी यांनी दिली. (प्रतिनिधी)