सरकार धर्माच्या नावाखाली विष पेरतंय - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 06:03 AM2019-02-24T06:03:20+5:302019-02-24T06:03:39+5:30
परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने शनिवारी दुसऱ्या संयुक्त जाहीर सभेत ते बोलत होते.
परळी (जि. बीड) : महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष पसरवत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली.
परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीच्या वतीने शनिवारी दुसऱ्या संयुक्त जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रा. जोगेंद्र कवाडे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.
या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाची आरक्षणाच्या मुद्दावर फसवणूक केली आहे. शेतकरी, तरु ण बेरोजगारांचीही दिशाभुल केली आहे. जाती धर्माच्या नावावर द्वेष पसरविला जात आहे. आरक्षणाच्या माध्यमातूनही जातीय धोरण अवलंबिले जात आहे. जनतेत दुही पसरविण्याचे काम सरकारकडून होत असल्याचे पवार म्हणाले.
यांच्या हाती पुन्हा सत्ता दिली तर पाच वर्षात आपल्याला मतदानाचा अधिकार राहणार नाही, ते संविधान बदलतील अशी भीती माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.