राज्यात युतीचे सरकार !
By admin | Published: December 6, 2014 03:10 AM2014-12-06T03:10:53+5:302014-12-06T06:20:12+5:30
शिवसेनेच्या १० आणि भाजपाच्या १९ अशा एकूण २० मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी विधान भवनासमोरील प्रांगणात होऊन १९९५ नंतर पुन्हा राज्यात युतीचे सरकार अस्तित्वात आले
राज्यात युतीचे सरकार ! मुंबई : शिवसेनेच्या १० आणि भाजपाच्या १९ अशा एकूण २० मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी विधान भवनासमोरील प्रांगणात होऊन १९९५ नंतर पुन्हा राज्यात युतीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेच्या दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे व डॉ. दीपक सावंत यांनी कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची, तर रवींद्र वायकर, संजय राठोड, विजय शिवतारे, दादा भुसे व दीपक केसरकर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाच्या गिरीश बापट, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, बबनराव लोणीकर व राजकुमार बडोले यांनी कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची तर प्रा. राम शिंदे, रणजित पाटील, विजय देशमुख, अंबरीश राजे आत्राम व प्रवीण पोटे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्रिमंडळात भाजपाने विदर्भाला अधिक स्थान दिले, तर शिवसेनेने विधान परिषदेच्या तीन सदस्यांना कॅबिनेटमध्ये संधी दिली. शपथविधी सोहळ््याला शिवसेना-भाजपाचे मंत्री भगवे फेटे परिधान करून आले होते. त्यांच्या शेजारी त्यांच्या पत्नीची बसण्याची व्यवस्था केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब दाखल होताच उपस्थित शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. शपथविधीच्या स्थळाभोवती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे असलेली पोस्टर्स लावली होती. त्यावर राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले, असे ठळकपणे नमूद केले होते. अनेक ठिकाणी शिवसेनेचेच भगवे झेंडे लागले होते. सेनेच्या रावते, देसाई, कदम, शिंदे व सावंत यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस अभिवादन करून मंत्रिपदाची शपथ घेतली. तर सावंत यांनी आपल्या आईच्या स्मृतीस अभिवादन केले. सेनेच्या राठोड, भुसे, शिवतारे व वायकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रणाम करून राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांना वंदन करून शपथ घेतली. भाजपाच्या राजकुमार बडोले यांनी आपले वडील सुदाम यांच्याबरोबर आई गंगाबाई यांचा आवर्जून उल्लेख केला, तर अंबरीशराजे आत्राम यांनी वडील सत्यवानराजे यांच्या स्मृतीस अभिवादन करून शपथ घेतली. बडोले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस तर प्रा. राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बडोले यांनी शपथ घेतल्यावर ‘जय हिंद, जय भीम, जय सेवा, जय भारत’ असा उल्लेख केला तर राठोड यांनी शपथ घेतल्यावर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल’ असा उल्लेख केला. भाजपाचे गिरीश महाजन शपथ घेण्याकरिता उभे राहिले तेव्हा ‘देश का नेता कैसा हो, गिरीश महाजन जैसा हो’ अशी घोषणाबाजी झाली. ‘एकच भाऊ गिरीश भाऊ’ही घोषणा महाजन समर्थकांनी दिली तेव्हा त्यांच्याच जिल्ह्यातील महाजन यांचे कट्टर विरोधक महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे सर्वांच्या माना वळल्या. एकनाथ शिंदे शपथ घेण्यास उभे राहिले तेव्हा ‘कोण आला रे कोण आला’ अशी घोषणाबाजी झाली. बबनराव लोणीकर निस्पृह शब्दाला अडखळले तर प्रवीण पोटे यांनी ‘श्रद्धा बाळगीन’ या शब्दाऐवजी ‘श्रद्धा बागलीन’ असा शब्द उच्चारला! या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (विशेष प्रतिनिधी)
> विदर्भाला झुकते माप मुख्यमंत्री फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विदर्भाचे. त्यासोबत आता चंद्रशेखर बावनकुळे आणि राजकुमार बडोले हेही कॅबिनेट मंत्री झाले आहेत. याशिवाय रणजित पाटील, प्रवीण पोटे व अंबरीशराजे आत्राम हे राज्यमंत्री म्हणजे विदर्भाचे ७ मंत्री झाले आहेत.