'रायगड किल्ल्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:13 AM2019-06-16T04:13:23+5:302019-06-16T04:13:52+5:30
तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न, आषाढी-कार्तिकी वारीप्रमाणे दरवर्षी रायगडवारीचाही संकल्प
बिरवाडी : रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र व राज्यातील सरकार कटिबद्ध आहे. रायगडासह राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जमलेल्या हजारो शिवभक्तांना रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
तिथीनुसार किल्ले रायगडावर ३४६ वा शिवराज्याभिषेक सोहळा वरुणराजाच्या हजेरीत दाट धुक्याच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा केला. शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीतर्फे तिथीनुसार गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून शिवराज्याभिषेकाचे आयोजन केले जाते.
रायगड किल्ल्यासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची पाचाड येथील समाधी व राजवाडा परिसरातील अत्यावश्यक सुविधांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. किल्ले रायगडच्या पुनर्निर्मिती करिता निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता राहणार नाही याकडेही जातीने लक्ष देणार असल्याचेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. या वेळी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, राजिप सदस्य मनोज काळीजकर, संजय कचरे, खेडेकर, महाड पंचायत समिती सभापती दत्ताराम फळसकर, माजी सभापती दीप्ती फळसकर आदींनी किल्ले रायगडावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
आमदार भरत गोगावले यांनी रायगड प्राधिकरण व रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून शिवभक्तांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगून आषाढी-कार्तिकी वारीप्रमाणे दरवर्षी रायगडवारीचाही संकल्प असल्याचे सांगितले.
शिवभक्तांचा जल्लोष
शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, कोकण कडा मित्रमंडळ आणि रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनी इतिहासतज्ज्ञ आप्पा परब यांच्या हस्ते पवित्र नद्यांचे पाणी व दुग्धाभिषेक करण्यात आला. ढोलताशाच्या गजरात तलवारी, भाले नाचवीत शिवभक्तांनी जल्लोष केला.