सरकारची दोनदा वर्षपूर्ती !
By admin | Published: December 3, 2015 04:06 AM2015-12-03T04:06:15+5:302015-12-03T09:12:17+5:30
राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने
- अतुल कुलकर्णी, मुंबई
राज्यातील शिवसेना-भाजपा युती सरकारची वर्षपूर्ती ३१ आॅक्टोबर रोजी मोठ्या धूमधडाक्यात साजरी झालेली असताना, आता पुन्हा नव्याने वर्षपूर्तीचा सोहळा आयोजित करून, शिवसेनेने आपला सवतासुभा कायम ठेवला आहे. त्यामुळे एकाच सरकारची दोनदा वर्षपूर्ती, अशी अजब घटना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे.
शिवसेनेने आपल्या ‘सत्तेचा’ वर्षपूर्ती समारंभ गुरुवारी रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, शिवसेनेच्या दहा मंत्र्यांच्या कार्यपुस्तिकांचे प्रकाशन होणार आहे. यासाठी शिवसेनेने केलेल्या जाहिरातीत बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दहा मंत्र्यांचे फोटो छापले आहेत.
‘आमच्यात कोणताही वाद नाही, जर शिवसेनेचे मंत्री नाराज असते, तर त्यांनी आपली नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली असती,’ असे सांगणारे भाजपा नेते शिवसेनेच्या वर्षपूर्ती सोहळ्याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.
कदाचित शनिवारी शपथविधी !
मंत्रिमंडळाचा गुरुवारी विस्तार होणार नाही, ही माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांनीच ‘लोकमत’शी बोलताना दिली. मात्र, नागपूर अधिवेशनाच्या आधी विस्तार होऊ शकतो, असे सांगत विस्ताराबाबतची उत्सुकता कायम ठेवली. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी कदाचित शपथविधी होऊ शकतो. त्यात एखाद्या विद्यमान मंत्र्याची घरवापसी होऊ शकते व काहींची खाती बदलली जाऊ शकतात. शिवसेनेने त्यांची दोन नावे तयार ठेवल्याचे समजते.
वर्षपूर्तीनिमित्त काढल्या जाणाऱ्या अहवालासाठी सेनेने प्रस्तावना मागितल्याची माहिती, स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ‘लोकमत’ला दिली. आपण अद्याप प्रस्तावना दिलेली नाही, पण कदाचित आज लिहून देईन, असेही ते म्हणाले.
- ‘सेनेच्या वर्षपूर्तीविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, आपण पेपर वाचलेला नाही,’ असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मात्र, खा. अनिल देसाई यांच्यासोबत विधानपरिषदेच्या जागांबद्दल बैठक झाल्याचे ते म्हणाले.
- फडणवीस सरकारने ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती साजरी केली, त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘आम्हाला कुठे वर्ष पूर्ण झाले?’ असे सांगत त्या सोहळ्यातून अंग काढून घेतले होते.
भाजपा-सेनेचे जागावाटप : विधान परिषदेच्या आठ जागांसंदर्भात नवी दिल्ली येथे बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सेनेचे खा. अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. यातील मुंबई, अकोला-बुलडाणा-वाशिम आणि अहमदनगर अशा तीन जागा शिवसेना तर उर्वरित पाच जागा भाजपा लढविणार आहे.