‘शासकीय संस्थांत समन्वय साधणे आवश्यक’
By admin | Published: November 2, 2016 02:38 AM2016-11-02T02:38:43+5:302016-11-02T02:38:43+5:30
विकासकामात या संस्थांशी समन्वय साधणे गरजेचे व तितकेच आव्हानाचे काम असल्याचे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केले
नवी मुंबई : शहरात विविध शासकीय संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे विकासकामात या संस्थांशी समन्वय साधणे गरजेचे व तितकेच आव्हानाचे काम असल्याचे मत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद अधिकाऱ्यांशी’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. असे असले तरी या शहरात मुंबईपेक्षा सुंदर होण्याची क्षमता असल्याचे मत गगराणी यांनी व्यक्त केले.
सुनियोजित शहर उभारताना चांगल्या पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत. एखादी छोटीशी घटना घडली तरी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे लोकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता, कायदा-सुव्यवस्था चांगली राखली गेल्यास लोकांचा वास्तव्यासाठी नवी मुंबई शहराकडे कल वाढेल, असे मत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले. नवी मुंबईमध्ये सामाजिक जबाबदारीचे भान बाळगून पत्रकार राबवत असलेल्या उपक्रमांची प्रशंसा करत कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. तर शहराचा सुनियोजित झालेला विकास, येथे असलेली मोकळी जागा, आदि बाबींवर नजर टाकताच आपल्याला बालपणीच्या जुन्या मुंबईची प्रकर्षाने आठवण झाल्याची कबुली सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे यांनी दिली.
याप्रसंगी सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, पनवेल महापालिकेचे आयुक्त-प्रशासक डॉ. सुधाकर शिंदे, नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे, पोलीस उपआयुक्त दिलीप सावंत, पोलीस उपआयुक्त नितीन पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत खैरे, माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक देवेंद्र भुजबळ, महापालिका उपआयुक्त उमेश वाघ, माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, ज्येष्ठ पत्रकार अशोक जालनावाला, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसाडीकर, दिलीप माने, सिडकोचे भूमी-भूमापन अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे, महापालिकेचे नगररचनाकार किशोर अग्रहारकर आदिंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.