राज्यात शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ!
By admin | Published: November 16, 2016 03:31 AM2016-11-16T03:31:40+5:302016-11-16T03:31:40+5:30
बहुतांश ठिकाणी खरेदी केंद्र सुरू ; शेतक-यांची पणनकडे पाठ; चलन बंदीचा जाणवला परिणाम.
अकोला, दि. १५- शासकीय कापूस खरेदीचा मंगळवारी शुभांरभ झाला असून, राज्यात ७0 पैकी बहुतांश ठिकाणी कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) उपअभिकर्ता म्हणून महाराष्ट्र सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने हमीदराने ही कापूस खरेदी सुरू केली आहे; परंतु शेतकर्यांनी पहिल्या दिवशी पणन महासंघाकडे पाठ फिरविली.
कापसाचा वेचणी हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्र कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाने यावर्षी येत्या १५ नोव्हेंबरपासून राज्यात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. केंद्र शासनाने कापसाचे हमीदर हे ४,१६0 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले आहेत. बाजारातील कापसाचे दर यापेक्षा कमी होऊ नयेत, याकरिता पणन महासंघ कापूस खरेदीसाठी सज्ज झाला आहे.
मागील दोन वर्षांपासून पणन महासंघ हा भारतीय कापूस महामंडळाचा(सीसीआय) उपअभिकर्ता म्हणून राज्यात कापूस खरेदी करीत आहे. मागील वर्षी पणन महासंघाने ८२ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली होती; पण यावर्षी १२ खरेदी केंद्रे कमी केली आहेत. कापूस खरेदी केंद्रे सुरू झाली असली, तरी पहिल्या दिवशी एकही शेतकरी पणन महासंघाकडे फिरकला नसल्याचे सायंकाळपर्यंतचे चित्र होते. विदर्भातील कापूस उत्पादक जिल्हय़ात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वाशिम जिल्हय़ातील मंगरू ळपीर, यवतमाळ जिल्हय़ातील वणी, यवतमाळ येथे मंगळवारी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला; परंतु शेतकरी या खरेदी केंद्रांकडे फिरकला नाही.
- नोटांच्या विमुद्रीकरणाचा खरेदीवर परिणाम
पणन महासंघाने कापूस खरेदी केली असली, तरी एक हजार व पाचशे रुपये नोटांच्या विमुद्रीकरणामुळे पणन महासंघाच्या कापूस खरेदीवर परिणाम झाल्याचे पणन महासंघाचे म्हणणे आहे. तसेच खासगी बाजारात कापसाचे दर सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांकडे शेतकरी फिरकला नाही.
कापूस खरेदी केंद्रे सुरु
राज्यात नागपूर विभागात सावनेर, वणी विभाग - चिमूर, यवतमाळ विभाग - पुसद, यवतमाळ, कळंब, दिग्रस, उमरखेड, अमरावती विभाग- अचलपूर, अकोला विभाग- मंगरूळपीर, खामगाव विभाग - जळगाव जामोद, औरंगाबाद विभाग- कुंभार पिंपळगाव, बाला नगर, परभणी विभाग - परभणी, परळी वैजनाथ (जि.बीड) विभाग - कोंडगाव हुडा, नामलगाव, नांदेड विभाग - भोकर, जळगाव विभागात - धुळे यासह राज्यात अन्य ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
-शासनाच्या सूचनेनुसार राज्यात ७0 कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत; पण पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत कापूस खरेदी झाला नव्हता. खासगी बाजारात कापसाचे दर पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकर्यांनी सध्या तरी पणनकडे कापूस आणण्याचे टाळले आणि पाचशे, हजाराच्या नोटा बंद झाल्याचाही तात्पुरता परिणाम झाला असावा.
डॉ. एन.पी. हिराणी,
अध्यक्ष,
पणन महासंघ, मुंबई.
-
- जिल्हय़ात जिथे सीसीआयची खरेदी केंद्रे आहेत, तेथे पणन कापूस खरेदी करणार नाही. पारस, बाळापूर येथे लवकरच खरेदी करणार.
- शिरीष धोत्रे,
संचालक,
पणन महासंघ, अकोला.