वीज दरवाढ रद्दबाबत सरकार बहिरे
By admin | Published: May 16, 2017 02:24 AM2017-05-16T02:24:56+5:302017-05-16T02:24:56+5:30
कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करण्याबाबत राज्य सरकार बहिरे झाले आहे. सरकारने याप्रकरणी वेळीच लक्ष घालून वीज दरवाढ रद्द न केल्यास नजीकच्या काळात सरकारच्या पोटात धडकी भरेल असे आंदोलन करू, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिला. प्रसंगी सर्व शेतकरी मंत्रालयाला मानवी साखळी करून घेरावो घालतील, असेही ते म्हणाले.
सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या कृषीपंपांची वीज दरवाढ रद्द करावी, सर्व कृषीपंपांना वीज मीटर बसवावीत, शेतकऱ्यांची चुकीची वीज बिले थकबाकी दाखवून चालू असलेली बदनामी थांबबावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी ‘महावितरण’च्या ताराबाई पार्कच्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, अरुण लाड, प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आण्णासाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.