शासनाचा निर्णय; वॉटर कप स्पर्धेतील गावांना मिळणार दीड लाखाचा निधी
By appasaheb.patil | Published: May 14, 2019 05:27 PM2019-05-14T17:27:34+5:302019-05-14T17:29:25+5:30
सोलापूर जिल्ह्यातील सहभागी १५९ गावांना मिळणार लाभ
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या १५९ गावांना शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून प्रत्येकी दीड लाखाचा निधी इंधनासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख यांनी दिली़ हा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाºया निधीतून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला प्रारंभ झाला आहे़ यंदाचे हे चौथे वर्ष असून जिल्ह्यातील २९० पैकी १५९ गावांनी सहभाग नोंदवित श्रमदानास सुरुवात केली आहे़ गावे पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानासाठी मोठी चळवळ उभी केली आहे़ याशिवाय काही गावात जेसीबी, पोकलेन मशीनचा वापर सुरू आहे़ मशीन्ससाठी लागणारे इंधन आता शासनाकडून मिळालेल्या पैशातून भागविण्यात येणार आहे़ वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मृद व जलसंधारणाची दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांची कामे श्रमदानाव्दारे करतील अशा गावांना प्रोत्साहन म्हणून मशीनव्दारे करण्यात येणाºया कामाकरिता इंधनाच्या खर्चातील प्रतिगाव १ लाख ५० हजार रुपयांचा निधी जलयुक्त शिवार अभियानाच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाºया निधीतून देण्यात येणार असल्याची माहिती सत्यवान देशमुख यांनी दिली.
खर्चाचा तपशील स्वतंत्रपणे ठेवा
पाणी फाउंडेशनमधील सहभागी गावांना शासनाकडून दीड लाखाची मदत करण्यात येणार आहे़ या निधीचा योग्य व पुरेपूर वापर व्हावा यासाठी शासनाचे अधिकारी प्रयत्नशील असणार आहेत़ याशिवाय लोकसहभागातून झालेल्या कामांचा तसेच मशीनव्दारे झालेल्या कामांचा तपशील स्वतंत्रपणे ठेवण्याच्या सूचना शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनास कळविल्या आहेत़ दरम्यान, ग्रामपंचायतीला उपलब्ध करून द्यावयाचा निधी, खर्च करण्याची कार्यपध्दती व खर्चाचा तपशील ठेवण्याच्या कार्यपद्धती जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीने निश्चित करावी असे शासनाचे अवर सचिव सु़द़ नाईक यांनी पत्रान्वये कळविले आहे़
स्वयंसेवी संस्था, कंपन्यांचा लागतोय हातभार
- सध्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना बालाजी अमाईन्स, प्रिसिजन कॅमशॉफ्ट आदी कंपन्यांकडून मदत म्हणून मशीन्स पुरविण्यात येत आहेत. याशिवाय अहमदनगर येथील स्नेहालय या संस्थेकडून सहभागी गावांना ईश्वर चिट्टी या उपक्रमाच्या माध्यमातून १ लाख रुपये देण्यात येत आहे़