कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब: काय आहे गौडबंगाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 03:00 PM2023-10-26T15:00:03+5:302023-10-26T15:29:08+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय गायब होतोच कसा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल

Government decision to pay crores of rupees suddenly disappears: Vijay wadettivar's criticism of the government | कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब: काय आहे गौडबंगाल?

कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब: काय आहे गौडबंगाल?

मुंबई - कोविड काळातील दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या प्रलंबित देयकाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संकेतस्थळावरून अचानक गायब केला. कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला केला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी सन २०२०-२१ या कोविड कालावधीतील दैनंदिन वापराच्या वस्तुंचे सुमारे ३१ कोटींचे देयक मान्यतेसाठी सादर केल्याची माहिती समोर येत आहे. त्यातील त्रृटी तपासून १८ कोटी ९२ लाख ८८ हजार ६४४ रूपयांचा शासन निर्णय संकेत स्थळावर अपलोड करण्यात आला. हा शासन निर्णय अचानक गायब करण्यात आला असून सार्वजनिक आरोग्य विभागाचे हे गौडबंगाल चव्हाट्यावर आले आहे. याबाबत संशय बळावला आहे. शासन निर्णय संकेतस्थळावरून काढताना कोणतीही विहिती कार्यपद्धती न अवलंबता असे कृत्य करणे हे नियमाला धरून नाही. त्यामुळे नियम पायदळी तुडवून हवे तसे, निर्णय घेणाऱ्या आरोग्य विभागाची अवस्था वाईट आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत सरकारचे आरोग्य विभागावर नियंत्रण राहिले नसल्याचेही खडेबोल वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले आहेत. तसेच हे प्रकरण नक्की काय आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे, अशी त्यांनी सरकारकडे मागणी केली आहे.  खासगी संस्थांचे हवेतसे, हळहळू, गरजेनुसार नियम पायदळी तुडवून खिसे भरण्याचा आरोग्य विभागाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला सरकार लगाम घालणार का? असा, सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी न करता खासगी संस्थांची काळजी करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कारभाराचा त्यांनी निषेध करत सरकारवर टीका केली.

Web Title: Government decision to pay crores of rupees suddenly disappears: Vijay wadettivar's criticism of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.