सरकारी डॉक्टरांचा बोगस डॉक्टरांवर भरवसा
By Admin | Published: June 6, 2017 02:51 AM2017-06-06T02:51:23+5:302017-06-06T02:51:23+5:30
किरकोळ उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे हे थेट खाजगी हॉस्पिटलमधील बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवत असल्याचे दिसून आले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरबाड : ग्रामीण रुग्णालयात अनेक समस्या असल्याने अगदी किरकोळ उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे हे थेट खाजगी हॉस्पिटलमधील बोगस डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवत असल्याचे दिसून आले आहे. या महागड्या उपचारामुळे शासनाच्या मोफत आरोग्यव्यवस्थेवर तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या व स्त्रीशक्ती संघटनेच्या पदाधिकारी नंदा गोडांबे यांना रात्रीच्या वेळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्यांच्या मुलांनी प्राथमिक उपचारासाठी मुरबाड ग्रामीण रु ग्णालयात नेले. तेथे ड्युटीवर असलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिंदे यांनी कोणतेही प्राथमिक उपचार न करता थेट मुरबाडमधील गणपती हॉस्पिटलमध्ये जाऊन ईसीजी काढण्यास सांगितले. हे हॉस्पिटल एक एमडी डॉक्टर चालवत असून त्यांच्या गैरहजेरीत रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर कोणत्या आजाराचे तज्ज्ञ आहेत, हे त्यांनाच ठाऊक नाही.
त्या डॉक्टरांनी नंदा गोडांबे यांचा ईसीजी काढला आणि त्यांच्या मुलांना सांगितले की, तुमच्या आईच्या हृदयाला दोन ब्लॉकेज आहेत. त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात अॅडमिट करावे लागेल. हे ऐकताच त्यांची मुले भयभीत झाली. मात्र, गोडांबे यांनी तातडीने अतिदक्षता विभागात अॅडमिट होण्याचे कारण काय, असे विचारले असता ग्रामीण रु ग्णालयाच्या डॉक्टरांनी तुम्हाला अॅडमिट करण्यास सांगितले, तसे करा. नंदा गोडांबे तेथे काढलेला ईसीजी घेऊन डॉ. शिंदे यांना दाखवण्यास ग्रामीण रु ग्णालयात गेल्या.
रात्री अडीच ते तीनच्या सुमारास ड्युटीवर असलेल्या परिचारिका ससाणे यांनी डॉक्टर झोपले आहेत. तुम्ही सकाळी या, अशी कारणे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉक्टर शिंदे तेथे आले. मात्र, त्यांनीही गोडांबे यांना एकेरी शब्दांत अरेरावीची भाषा वापरून अपमानित केले. यामुळे गोडांबे यांनी राज्याचे आरोग्य संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देऊन आपल्यावरील अन्यायाची दाद मागितली आहे.
डॉ. शिंदे यांच्याशी संपर्कसाधला असता ते रु ग्णालयात उपलब्ध नव्हते. इतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता ते फक्त शनिवार आणि रविवार दोनच दिवस रु ग्णांवर उपचार करतात आणि पगार मात्र सगळ्या दिवसांचा घेतात, असे सांगितले.
>कारवाई अपयशी ठरली नागरिकांमध्ये संताप
तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास आरोग्य प्रशासन सप्शेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे या बोगस डॉक्टरांची दुकाने जोरात चालत असून त्यांना शासनाच्या आरोग्य विभागातील डॉक्टरच रु ग्ण पुरवत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात तक्रार आली आहे. त्यासंदर्भात संबंधित डॉक्टर आणि परिचारिका आणि रुग्णालय प्रशासन यांचा तत्काळ खुलासा मागवण्यात आला आहे. तो मिळताच, कारवाई करु.
- डॉ. केम्पी पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक,ठाणे