सरकार लेखकांच्या पाठीशी उभे राहत नाही : मुख्यमंत्र्यांची कबुली
By admin | Published: February 4, 2017 04:57 AM2017-02-04T04:57:09+5:302017-02-04T04:57:09+5:30
आपली अभिव्यक्ती ठामपणे करणाऱ्या लेखक, साहित्यिकांच्या पाठीमागे सरकारने उभे राहायला हवे. मात्र आम्ही तसे उभे राहत नाही, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र
- डोंबिवलीत मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
पु. भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : आपली अभिव्यक्ती ठामपणे करणाऱ्या लेखक, साहित्यिकांच्या पाठीमागे सरकारने उभे राहायला हवे. मात्र आम्ही तसे उभे राहत नाही, अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. मात्र यापुढे सरकार आणि साहित्यिक यांच्यातील संवाद वाढवून साहित्यिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी संंमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, विशेष अतिथी हिंदी साहित्यिक विष्णू खरे, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हजर होते.
हिंदी साहित्यिक खरे यांनी त्यांच्या भाषणात साहित्यिकांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मुद्दा अधोरेखित केला होता. अशा वेळी सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहत नाही, अशी खंत व्यक्त केली होती. वाचकांनी आपल्या लाडक्या लेखकांचे अशा वेळी संरक्षण करावे, असा सल्ला खरे यांनी दिला होता. तत्पूर्वी श्रीपाल सबनीस यांनी दाभोलकर, पानसरे यांच्या हत्यांचा संदर्भ देत पोलीस दलावर कोरडे ओढले. सबनीस यांनाही सनातनवाद्यांकडून आलेल्या धमक्यांचा उल्लेख करीत आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला तर मृत्यूसमयी जे सरकार सत्तेवर असेल त्याची ती जबाबदारी असेल, असा हल्ला चढवला होता.
खरे व सबनीस यांच्या भाषणाचा संदर्भ घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरील कबुली तर दिलीच; पण यापुढे साहित्यिक व सरकार संवाद वाढवण्याचे आश्वासनही दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, सारस्वतांच्या मेळाव्यात आपल्याला हजर राहणे शक्य झाले याचा मला आनंद वाटतो. कारण ही इतिहासात नोंद करणारी गोष्ट आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने यायला मिळते किंवा कसे, असे वाटत होते. अन्यथा निवडणूक आयुक्तांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन करावे लागले असते, असा चिमटा त्यांनी काढला. कधीकधी आचारसंहितेचा अतिरेक होतो, अशी टिप्पणीही केली.
मराठी शाळा जगवण्याबाबत चिंता केली जाते, याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले की, मराठी शाळा अनुदानाने नव्हे तर मराठी भाषा ज्ञानभाषा केली तरच जगतील. २१ व्या शतकातील ज्ञानभाषेची मूल्ये जोपर्यंत आपण अभ्यासक्रमात समाविष्ट करीत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियाना’ला गेल्या दोन वर्षांत चांगले यश लाभले असून शैक्षणिक गुणवत्तेत देशात १८ व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. काही विद्यार्थी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश करीत आहेत. ‘सिस्को’च्या सीईओंनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. मराठी साहित्याचे पुस्तके हे शाश्वत माध्यम आहे. मात्र नव्या पिढीपर्यंत साहित्य पोहोचवायचे असल्यास डिजिटल माध्यमाचा वापर करावा लागेल, याकडे फडणवीस यांनी लक्ष
वेधले. (विशेष प्रतिनिधी)
पवार, शिंदे यांची दांडी
राज्यात महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षात बंडखोरी उफाळून आलेली असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमेलनाच्या उदघाटनाला येण्याचे टाळले. युती तुटल्यामुळे की संमेलनाच्या आयोजनात शिवसेनेचा फारसा सहभाग नसल्याने शिंदे यांनी येण्याचे टाळले, अशी कुजबुज सुरु होती.
नेमाडे, श्याम मनोहर नोबेलपात्र लेखक - खरे
मराठी भाषेतील साहित्यिक भालचंद्र नेमाडे व श्याम मनोहर हे नोबल मिळण्याच्या योग्यतेचे लेखक आहेत. परंतु त्यांचे व अन्य मराठी लेखकांचे साहित्य हे विदेशी भाषांमध्ये अनुवादित होत नसल्याने त्याला वैश्विक पातळीवर मान्यता प्राप्त होत नसल्याची खंत हिंदीतील ख्यातनाम लेखक व संमेलनाचे विशेष अतिथी विष्णू खरे यांनी व्यक्त केली.
गोळ््या घातल्या, तरी नथुरामी प्रवृत्तीचे समर्थन नाही- सबनीस
महात्म्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या नीच प्रवृत्तीचे मी मला गोळ््या घातल्या तरी समर्थन
करणार नाही. मला सनातन्यांकडून धमक्या आल्या असून समजा मला गोळ््या घातल्या तर तत्कालीन सरकार हे माझ्या मृत्यूला जबाबदार असेल, अशी घणाघाती टीका माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस
यांनी केली.
संयुक्त महाराष्ट्राची घोषणाबाजी
मुख्यमंत्री फडणवीस बोलायला उभे राहिले तेव्हा बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत फलक घेऊन काहीजण उभे राहिले. लागलीच आपलीही तीच भूमिका असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले व घोषणाबाजी थांबली. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना मंडपाबाहेर नेले.
२७ गावांबाबत वझे व माझी भूमिका एकच
केडीएमसीमध्ये समाविष्ट केलेल्या २७ गावांकरिता स्वतंत्र नगरपालिका करण्याबाबतची मागणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी आपल्या भाषणात केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वझे यांचा उल्लेख स्वागताध्यक्ष व २७ गावांच्या संघर्ष समितीचे नेते असा केला. या विषयावर तुमच्या व माझ्या भूमिकेत फरक नाही. मात्र केव्हा, कसे व काय करायचे ते आपण नक्की ठरवू, असे फडणवीस म्हणाले.
बोलीभाषा हे महावस्त्र - काळे
प्रत्येक कलाकृती ही जाणकार रसिकांच्या मिठीकरिता आसूसलेली असते, असे उद्गार संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी काढले. मराठी बोलीभाषा ही समृद्ध आहेच.
पण ती टिकवण्याची गरज आहे. इंग्रजीचे अतिक्रमण वाढत असल्याने आपल्याच बोलीभाषांकडे आपलेच दुर्लक्ष झाले आहे. बोलीभाषा हे आपले महावस्त्र आहे, ते जीर्ण होण्यापासून वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.