लोककलेचा सन्मान करणे शासनाचे कर्तव्य
By admin | Published: March 22, 2017 02:27 AM2017-03-22T02:27:17+5:302017-03-22T02:27:17+5:30
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव
नवी मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणारा तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार राधाबाई खोडे नाशिककर यांना प्रदान करण्यात आला. कला व संस्कृती टिकविण्यासाठी लोककलेचा व कलावंतांचा सन्मान करणे शासनाचे कर्तव्य असल्याचे मत या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे.
राज्य शासनाच्यावतीने वाशीमध्ये राज्य ढोलकीफड तमाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राधाबाई खोडे नाशिककर यांना विठाबाई नारायणगावकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मनोगत व्यक्त करताना विनोद तावडे म्हणाले की, लोककला जीवन समृद्ध करते. त्यामुळे संस्कृती राहात असते. यामुळे लोककलेचा सन्मान करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. कलेच्या क्षेत्रात राजकारण नको यासाठी मागील वर्षीचे पुरस्कार विजेते गंगारामबुवा कोठेकर यांच्या हस्तेच पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. वृद्धापकाळात कलाकारांची कोणी दखल घेत नाही, असे मत पुरस्कार विजेत्या राधाबाई यांनी व्यक्त केले. यावर यापुढे शासन अशा कलावंतांची दखल घेईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
२५ मार्चपर्यंत ढोलकी फड तमाशा महोत्सव सुरू राहणार असून राज्यातील नामांकित कलाकार सहभागी होणार आहेत. पुरस्कार वितरण प्रसंगी महापौर सुधाकर सोनावणे, आमदार मंदा म्हात्रे, नरेंद्र पाटील, सुरेश हावरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)