सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 03:09 AM2020-02-25T03:09:54+5:302020-02-25T03:10:12+5:30
२९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
मुंबई : राज्य शासकीय कार्यालयांचे कामकाज २९ फेब्रुवारीपासून आठवड्यातून पाच दिवस चालेल. पाच दिवसांचा आठवडा करताना दररोजच्या कामाची वेळ ४५ मिनिटे वाढवून देण्यात आली आहे.
ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम लागू आहे किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात, अशा कार्यालयांना व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांच्यासाठी मात्र पाच दिवसांचा आठवडा नसेल.
या शिवाय, जलसंपदा विभागाच्या कर्मशाळा, व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट; नागपूर, शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग, दुग्ध विकास योजना, शासकीय मुद्रण व लेखनसामुग्री संचालनालयांतर्गत येणारी मुद्रणालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारागृहे, महसूल व वनविभागांतर्गत येणारे बल्लारपूर, परतवाडा, डहाणू येथील
एकात्मिक घटक, अल्लापल्ली येथील शासकीय मालकीची सॉ मिल, परतवाडा, बल्लारपूर येथील वन कार्यशाळा, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालये; पुणे येथे पाच दिवसांचा आठवडा नसेल. हे वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये महिन्यातील सर्व शनिवार, रविवारी सुटी असेल.
कामाच्या नव्या वेळा
शिपाई वगळता सर्व शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी राहील.