शासकीय कर्मचाऱ्यांचे बँक खाते परस्पर जनधनमध्ये परावर्तीत
By admin | Published: December 23, 2016 04:04 AM2016-12-23T04:04:40+5:302016-12-23T04:04:58+5:30
कोणताही अर्ज केला नसताना अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे नियमित बँक खाते जनधन योजनेच्या खात्यात परावर्तीत करण्यात
वरोरा (चंद्रपूर) : कोणताही अर्ज केला नसताना अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचे नियमित बँक खाते जनधन योजनेच्या खात्यात परावर्तीत करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतापामुळे खात्यातून पैसे काढण्याला आता मर्यादा आल्याने कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला आहे. या बाबीकडे बँकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संबंधित कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा होते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार या कर्मचाऱ्यांना आठवड्याला २४ हजार रुपये काढता येतात. तर, जनधन खात्यातून १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येत नाही. या संदर्भात खाते परावर्तीत झालेले कर्मचारी बँकेत अर्ज देऊन विचारणा करीत आहेत. मात्र त्याला बँकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)
बँकांचा नवीन खाते उघडण्याचा सल्ला
नियमित बँक खाते जनधन योजनेत परावर्तीत झाले असल्याने आता याच बँकेत दुसरे बचत खाते उघडण्याचा सल्ला बँकेचे अधिकारी देत आहेत. नवीन खाते उघडण्याकरिता प्रक्रिया कोण करणार, यावरही बँकेकडून उत्तर मिळत नाही. त्यातच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्याने वेतनाकरिता नवीन बँक खाते उघडल्यास त्याची माहिती आपल्या कार्यालयाच्या मुख्यालयी द्यावी लागते. त्यामध्ये दीड ते दोन महिन्यांचा वेळ निघून जातो.
रिझर्व्ह बँकच देईल निर्देश : यासंदर्भात संबंधित बँक अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, बँक खाते परावर्तीत करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेलाच असल्याने तेच पुढील निर्देश देतील.