सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरवस्था
By admin | Published: April 3, 2017 03:38 AM2017-04-03T03:38:34+5:302017-04-03T03:38:34+5:30
पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील जुना ठाणा नाका रस्त्यावरील सरकारी वसाहतीची दुरवस्था झाली असून, या ठिकाणी ५२ कुटुंबे रामभरोसे राहत आहेत. सरकारी कर्मचारी असल्याने कुणाकडे तक्रार करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे या वसाहतीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
मोडकळीस आलेल्या इमारती, परिसरात अस्वच्छतेबरोबरच पाण्याच्या टाक्यांची दैना झाली असून, संरक्षण भिंतीचा तर पत्ताच नाही. ड्रेनेज लाइन तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे, शिवाय दुर्गंधीही पसरली आहे. भटक्या प्राण्यांचा वावर आदी समस्यांमुळे परिसरातील कुटुंबे त्रस्त असून याप्रकरणी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
रायगड जिल्हा परिषदेचा कर्मचारीवर्ग राहत असलेल्या पनवेल येथील शासकीय वसाहतीत सहा इमारतींत द्वितीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या २, चतुर्थ श्रेणी अधिकाऱ्यांच्या ६ आणि तृतीय श्रेणी अधिकाऱ्यांच्या ३४ व इतर अशा एकूण ५२ खोल्या आहेत. मात्र, वसाहतीच्या दुरवस्थेमुळे रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. दुरवस्थेबाबत परिसरातील तरुण संबंधित विभागाकडे तक्रार करण्यासाठी गेले असता, राहायचे तर राहा, नाहीतर निघून जा, असे उत्तर दिले जाते.
गेल्या पाच वर्षांत इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. येथील पाण्याची टाकी इतकी धोकादायक झाली आहे की कधीही कोसळू शकते. इमारतीला तडे गेले आहेत. रहिवाशांनी स्वखर्चाने पंपहाउस दुरुस्तीचे तसेच ड्रेनेजचे काम केले आहे. मात्र वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने गेल्या महिन्यात पंपहाउसची वीज खंडित केल्याचे समजते. येथील इमारतींच्या जिन्यावर विजेची व्यवस्था नाही.
वसाहतीत धूरफवारणी होत नसल्याने डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. वसाहतीला संरक्षण भिंत नसल्याने भटके प्राणी, फेरीवाल्यांचा सर्रास वावर असतो. पोलिसांनी
जप्त केलेल्या गाड्याही याच परिसरात उभ्या असतात. या वसाहतीला पालिकेकडून दिवसातून अर्धा तास पाणी दिले जाते. येथे नळजोडण्या वाढवण्याची मागणीही गेल्या
अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. (वार्ताहर)
पाण्याची टाकी
झाली धोकादायक
वसाहतीत पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ केल्या जात नाही. त्यामुळे सतत आरोग्याच्या व्याधी उद्भवतात. पाणी सोडणारा कर्मचारी स्वत:च्या सोयीनुसार काम करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. येथील पाण्याची टाकी इतकी धोकादायक झाली आहे की कधीही कोसळू शकते. इमारतीला तडे गेले आहेत.