दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी

By Admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:36+5:302016-04-03T03:51:36+5:30

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी

Government failures in drought management | दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी

दुष्काळी उपाययोजनांत सरकार अपयशी

googlenewsNext

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत, गंभीर प्रश्न असून केंद्र व राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी केली.
कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक दिवंगत नानासाहेब सगरे यांच्या सहकार शिल्पाचे अनावरण पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार जयंत पाटील होते.
पवार म्हणाले की, शेतकरी दुष्काळात होरपळू लागला आहे. जनावरे कत्तलखान्यात जाऊ लागली आहेत. राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. सिंचन योजनांची कामे रखडली आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. वेळप्रसंगी संघर्षाचा मार्ग पत्करू व राज्य शासनाला वठणीवर आणू. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्याला विकासवादी नेत्यांची फळी मिळाली. त्यातील नानासाहेब सगरे हे राजारामबापूंच्या मार्गदर्शनाखाली वाढलेले होते. जनतेसाठी धडपडणारा हा माणूस होता. त्यांनी दुष्काळी पठारावर जिद्दीने कारखाना स्थापन करून तो चालविला.
आमदार जयंत पाटील म्हणाले की, आमचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, परंतु हे सरकार शेतकऱ्यांचा मुळावर उठले आहे. आधी पैसे भरा, मगच पाणी, ही सरकारची भूमिका चुकीची आहे. आम्ही आमच्या हयातीत एवढे महागडे पाणी बघितले नव्हते. म्हैसाळ, टेंभू, आरफळ या योजना पूर्ण करण्याची पात्रता राज्य सरकारची नाही.
डॉ. पतंगराव कदम यांनी भाजपच्या खोट्या आश्वासनांना भुलून मतदारांनी सत्ता दिली, परंतु आता सर्वांनाच त्याचा मन:स्ताप होत आहे. भविष्यात हीच जनता भाजपची सत्ता उलथवून टाकेल, असे सांगितले.
विजय सगरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार प्रभाकर कोरे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार विलासराव शिंदे, मानसिंगराव नाईक, प्रा. शरद पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख, गणपतराव पाटील,
अरुण लाड, गणपती सगरे, दिलीप पाटील, इलियास नायकवडी, चंद्रकांत हाक्के, ताजुद्दीन तांबोळी,
सुरेश पाटील उपस्थित होते.
(वार्ताहर)

पाणीपट्टी कमी करण्यासाठी पवार यांनी लक्ष घालावे : सुमनताई
सिंचन योजनांची पाणीपट्टी जास्त आहे. ती कमी करण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष घालावे व दुष्काळी तालुक्यांचा पाणीप्रश्न मिटवावा, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी केली.

Web Title: Government failures in drought management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.