साठेबाजांसमोर सरकार हतबल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 06:16 AM2016-08-21T06:16:01+5:302016-08-21T06:16:01+5:30
तूरडाळ मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असताना आणि आफ्रिकेच्या वायदेबाजाराचा एका किलोसाठीचा दर ६० रुपये असतानाही महाराष्ट्रात तूरडाळीचे किरकोळ दर कमी करण्यास
- अतुल कुलकर्णी, मुंबई
तूरडाळ मोठ्या प्रमाणावर बाजारात येत असताना आणि आफ्रिकेच्या वायदेबाजाराचा एका किलोसाठीचा दर ६० रुपये असतानाही महाराष्ट्रात तूरडाळीचे किरकोळ दर कमी करण्यास व्यापारी तयार नाहीत, साठेबाजही सगळ्याच डाळींचे साठे करीत असूनही राज्य सरकार साठेबाजांपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे तूरडाळीऐवजी वाटाण्याची डाळ मुबलक प्रमाणात व स्वस्त दरात उपलब्ध असल्याने तिचा वापर करण्यावर भर देण्याचे अन्न व पुरवठा विभागाने ठरविले आहे.
काट्याने काटा काढायचा, या न्यायाने ‘पिवळा वाटाणा स्पील्ट’ या नावाने ओळखली जाणारी डाळ होलसेल बाजारात ३० रुपये किलो तर किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे तसा फार फरक दोन्हीतील प्रथिनांमध्ये नाही. मात्र तूरडाळ खुल्या बाजारात १२५ रुपये तर काही मॉलमध्ये १८० रुपये दराने विकली जात आहे. त्याचवेळी पिवळ्या वाटाण्याची टरफले काढलेली डाळ ४० ते ४५ रुपये किलोने विकली जात आहे. त्यामुळे हीच डाळ जनतेने जास्तीत जास्त वापरावी, असा प्रसार आणि प्रचार वाढवण्याचे धोरण हा विभाग आखत आहे.
सिंधुदुर्गातील तूरडाळ रोखली
वेंगुर्ल्यातील दक्षता पथकांनी खराब तूरडाळीचे नमुनेच मंत्रालयात आणले. त्यानंतर मंत्री गिरीश बापट यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचेही आदेश दिले. हा माल शिवशक्ती डाळ इंडस्ट्रीज, गुलबर्गा यांनी पाठवला होता.
ज्या रेशन दुकानात तूरडाळ पोहोचली, तेथे तिचे वाटप थांबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सरकारच्या दक्षता समित्या काही ठिकाणी चांगले काम करत आहेत, तर काही ठिकाणी त्यांच्याकडूनही ‘आमचे काय’ अशी विचारणा सुरू झाल्याच्या तक्रारीही येत आहेत.
पुरेशी डाळ उपलब्ध
सरकारने नॅशनल कमॉडिटी स्टॉक एक्सचेंजकडे दर महिन्याला ७ हजार मेट्रिक टन तूरडाळ रेशन दुकानांसाठी मागविली आहे. खुल्या बाजारासाठी ४ हजार मेट्रिक टन तूरडाळही येईल. गेल्या चार दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, नागपूर, अकोला या प्रमुख बाजारपेठांत १५,८३५ क्विंटल तूरडाळ विक्रीसाठी आली आहे.
मोठ्या प्रमाणात डाळ येत असूनही नफेखोरीसाठी ती दडवून ठेवणाऱ्या मॉलवर धाडी घालण्याची तयारी सुरू आहे. धाडीत कोणते मोठे मासे यात सापडतात यावर बरेच अवलंबून आहे.
प्रत्येक १०० ग्रॅम
डाळीत प्रथिनांचे प्रमाण
मसूर २६ ग्रॅम
चणाडाळ२५.४ ग्रॅम
उडीद२४ ग्रॅम
मूग२३.८६ ग्रॅम
तूरडाळ२२.३ ग्रॅम
पिवळा वाटाणा२०.० ग्रॅम
काळा वाटाणा१२ ग्रॅम
हरभरा१३ ग्रॅम