सरकारकडून आश्वासनाची पूर्तता; 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासाठी शासन निर्णय जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 21:09 IST2025-03-13T21:08:45+5:302025-03-13T21:09:12+5:30

स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे.

Government fulfills promise decision issued to build Maratha Bravery Memorial | सरकारकडून आश्वासनाची पूर्तता; 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासाठी शासन निर्णय जारी

सरकारकडून आश्वासनाची पूर्तता; 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्यासाठी शासन निर्णय जारी

Maharashtra Government: पानिपतच्या ‘काला अंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे. "पानिपतच्या तिसऱ्या लढाईला २६४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पानिपत येथील 'काला अंब' परिसरात मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पानिपतमध्ये मराठा युद्धवीरांचे 'मराठा शौर्य स्मारक' उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करणारा हा  शासन निर्णय जारी करण्यात आला आहे," अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

शासनाच्या निर्णयात म्हटलं आहे की, "मराठा साम्राज्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या विविध ठिकाणी आपले साम्राज्य निर्माण केले होते. अटकेपासून कटकपर्यंत मराठा साम्राज्याच्या पताका डौलाने फडकविल्या गेल्या होत्या. त्याच्या पराक्रमाची साक्ष देणारी बरीच स्थळे महाराष्ट्राच्या बाहेर अपरिचित आहेत. अशा स्थळासाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा येणा-या पुढच्या पिठ्यांकडे कायम राहावा, त्या स्थळांची, त्या वारश्यांचे जतन, संवर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याकरिता जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. यातूनच हरियाणातील पानिपत येथे सन १७६१ साली मराठा सेनेने अत्यंत धीरोदात्तपणे व शौर्याने अहमदशहा अब्दाली विरुध्द निकराची झुंज दिली. या युद्धात मराठा साम्राज्याची अपरिमित अशी हानी झाली मात्र, या लढाईने भारताच्या इतिहासात या महान बलिदानाचा पराभव सुध्दा संस्मरणीय ठरला. मराठ्यांनी एका महान उद्देशासाठी विदेशी आक्रमक अहमदशहा अब्दाली विरुध्द रणसंग्राम केला. या महान लढाईचा इतिहास आणि त्या वीरांचा सन्मान करणे याकरिता त्यांचे स्मारक निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे," अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, "हे स्मारक राष्ट्रीयत्व, सर्वधर्मसमभाव, लवावू वृत्ती, असीम त्याग या मूल्यांची प्रेरणा तसेच राष्ट्र प्रेमाचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात वंदनीय व्हावे या हेतूने मराठा शौर्य स्मारक निर्माण करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे," असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

Web Title: Government fulfills promise decision issued to build Maratha Bravery Memorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.