एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत शासन पूर्ण सकारात्मक, संप मागे घेण्याचे मंत्री दिवाकर रावते यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 09:07 PM2017-10-17T21:07:05+5:302017-10-17T21:07:43+5:30
दिवाळीच्या काळात लोक प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असतात. यापुर्वीच्या दर दिवाळीला एसटी कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळी सोडून जनतेची सेवा केली आहे.
मुंबई - दिवाळीच्या काळात लोक प्रवासासाठी एसटीवर अवलंबून असतात. यापुर्वीच्या दर दिवाळीला एसटी कर्मचाऱ्यांनी आपली दिवाळी सोडून जनतेची सेवा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीबाबत आम्ही पूर्ण सकारात्मक आहोत. पण त्यासाठी चर्चा करण्याऐवजी लोकांची गैरसोय करणे योग्य नाही. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला संप तातडीने मागे घ्यावा, लोकांना आनंदाने घरी जाऊन दिवाळी साजरी करु द्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.
मंत्री श्री. रावते म्हणाले की, संप करणे, मागण्या करणे हा कर्मचाऱ्यांचा लोकशाही हक्क आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत आम्ही नेहमीच सकारात्मक आहोत. पण यासाठी कर्मचाऱ्यांची मागणीही वाजवी असली पाहीजे. महामंडळाचे उत्पन्न किती आहे, त्यांना किती पगारवाढ देणे शक्य आहे हे लक्षात घेऊनच मागणी करणे गरजेचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत मुख्यमंत्र्यांनीही पूर्ण सकारात्मकता दाखविली आहे. त्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली असून त्यात एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. या संघटनांनी समितीसोबत चर्चेसाठी पुढे यावे, समितीमध्ये निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना निश्चित वेतनवाढ दिली जाईल, असे ते म्हणाले.
लोकांची गैरसोय थांबवून आपल्या अन्नदात्यास आनंदाने दिवाळी साजरी करु द्यावी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
खाजगी वाहनांना प्रवासी वाहतुकीस परवानगी
संपकाळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यातील सर्व खाजगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री. रावते यांनी दिली आहे. तसेच संपकाळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खाजगी बसेसना एसटी बसस्थानकांतून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत साधारण ३ हजार ८५८ खाजगी वाहने प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध झाली असून त्यात वाढ होत आहे, असेही त्यांनी सांगितले.