सरकारने दिली 798 कोटींची टोल नुकसानभरपाई; ‘आरटीआय’अंतर्गत उघड झाली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 03:50 PM2023-10-10T15:50:43+5:302023-10-10T15:51:26+5:30
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीतील हे टोल नाके होते.
मुंबई : बंद पडलेले १२ टोल नाके आणि जिथे छोट्या वाहनांना टोलमाफी दिली गेली होती असे ५३ टोल नाके या सगळ्यांसाठी संबंधित कंत्राटदारांना २०१६ मध्येच ७९८ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली गेल्याचे माहिती अधिकारांतर्गत उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीतील हे टोल नाके होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबतची माहिती मागितली होती. त्यावर या विभागाचे अवर सचिव शैलेंद्र बोरसे यांनी द्याव्या लागलेल्या नुकसान भरपाईचा तपशील दिला.
टोलनाके आणि नुकसानभरपाई
- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ :
यांच्या अखत्यारीतील ५३ टोलनाक्यांपैकी एक टोलनाका बंद करण्यात आल्याने १६८ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली होती. १२ प्रकल्पांवरील २६ टोलनाक्यांवर कार, जीप तसेच एसटी आणि स्कूल बसना टोलमधून सूट दिल्यामुळे २०१५-१६ या वर्षात २२४ कोटी रुपये द्यावे लागले होते.
- सार्वजनिक बांधकाम विभाग :
यांच्या अखत्यारीतील ३८ टोलनाक्यांपैकी ११ टोल बंद केल्यामुळे २२६ कोटी रुपये परतावा द्यावा लागला होता. तसेच उर्वरित १९ प्रकल्पांवरील २७ टोलनाक्यांवर कार जीप तसेच एसटी आणि स्कूल बस यांना टोलमधून सूट दिल्याने २०१५-१६ या वर्षांत कंत्राटदारास १७९ कोटी रुपये द्यावे लागले होते.
बंद टोलनाके
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील ५३ टोलनाक्यांपैकी चंद्रपूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज तडाली (आरओबी) टोलनाका बंद झाला
असून, त्यासाठी एकरकमी १६८ कोटी रुपये दिले गेले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील ३८ पैकी ११ टोलनाके बंद केले गेले. त्यात अलिबाग-पेण-खोपोली, पुण्यातील मावळ येथील वडगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पातील दोन नाके आणि मोहोळ-कुरुळ-कामती-मंद्रुप, सोलापूर येथील टेंभुर्णी -कुर्डूवाडी-बार्शी लातूर वाडी, अहमदनगर करमाळा- टेंभुर्णी रस्ता, नाशिक-वणी रस्ता, भुसावळ येथील यावल फैजपूर रस्ता आणि खामगाव वळण रस्ता येथील टोल नाक्यांचा समावेश आहे.