सरकारी अनुदान आले, शेतकरी मात्र सापडेनात! लाभार्थी गेले कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:32 AM2020-08-23T02:32:41+5:302020-08-23T07:42:23+5:30
कोट्यवधीचे अनुदान पडून, अनुदानाचा लाभ देण्यासाठी संस्था लाभार्थींचा शोध घेत आहेत; परंतु दोन महिन्यांपासून १ हजार २५ शेतकऱ्यांचा पत्ताच लागला नाही़
हरी मोकाशे
लातूर : हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्री केलेल्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.सन २०१७- १८ मध्ये तूर, हरभरा खरेदी न होऊ शकलेल्या पात्र २ हजार ९२५ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून ३ कोटी २६ लाख २५ हजार २४४ रुपये उपलब्ध झाले़ मात्र, दोन महिने उलटले तरी अनुदानाचा लाभ देण्यासाठी १ हजार २५ शेतकरी प्रशासनास सापडेनासे झाले आहेत़
सन २०१७- १८ मध्ये तूर आणि हरभºयाचे चांगले उत्पादन झाल्याने बाजारपेठेत दर घसरले होते़ परिणामी, शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर मिळाला होता़ त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदी केंद्रावर हा शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती आणि खरेदी न झालेल्या शेतकºयांसाठी राज्य सरकारने प्रति क्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करून ही रक्कम नाफेडकडे वर्ग केली होती़
जिल्ह्यातील १ हजार १६० तूर उत्पादकांसाठी ९८ लाख ४० हजार ३२४ तर १ हजार ७६५ हरभरा उत्पादक शेतकºयांसाठी २ कोटी २७ लाख ८४ हजार ९२० रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते़ या पात्र शेतकºयांच्या याद्या तालुका पातळीवरील खरेदी केलेल्या शेतकरी संस्थांकडे पाठविण्यात आल्या होत्या़
या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकºयांनी बँक खाते क्रमांक आणि आधार कार्डची प्रत देणे गरजेचे आहे़ दरम्यान, नाफेडने नियुक्त केलेल्या संस्थांमार्फत आजपर्यंत ६३९ तूर उत्पादक शेतकºयांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना ५५ लाख १४ हजार २८३ रुपयांचे तर १ हजार २६१ हरभरा उत्पादकांना १ कोटी ६३ लाख ७८ हजार ७०० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले
आहे़
दोन महिन्यांपासून लाभार्थींचा शोध
अनुदानाचा लाभ देण्यासाठी संस्था लाभार्थींचा शोध घेत आहेत; परंतु दोन महिन्यांपासून १ हजार २५ शेतकºयांचा पत्ताच लागला नाही़ तूर, हरभरा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान जाहीर करून निधी उपलब्ध करून दिला आहे़ आतापर्यंत १९०० शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे़ अद्याप १ हजार २५ शेतकºयांचा शोध सुरू आहे़ त्यामुळे १ कोटी ७ लाख ३२ हजार १६१ रुपये पडून आहेत, असे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश हेमके यांनी सांगितले़