सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंत वेळ, आरक्षण आम्ही घेणारच; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:29 AM2023-12-22T11:29:58+5:302023-12-22T11:31:00+5:30

आरक्षण हा मुद्दा आग्रहाने चर्चेत आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने दिलेला शब्द पाळावा. काहीही केले तरी मराठे आरक्षण घेणारच आहे असं जरांगेंनी म्हटलं.

Government has only time till 24 December, we will take maratha reservation; Manoj Jarange patil ultimatum | सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंत वेळ, आरक्षण आम्ही घेणारच; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंत वेळ, आरक्षण आम्ही घेणारच; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम

जालना - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi Newsमराठा आरक्षणासाठी आम्ही करत असलेले उपोषण सोडतच नव्हता. मंत्रिमंडळानं आम्हाला शब्द दिला होता. ज्याची नोंद १९६७ पूर्वीची मिळाली त्याचा संपूर्ण परिवार मग कितीही संख्या असेल. त्याचे नातेवाईक आणि सर्व रक्ताचे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आमचे ध्येय मराठा आरक्षणावर आहे. सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिलाय. त्यानंतर बघू असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खूप पिढ्यानंतर एखादा समुदाय एकत्र आला तर तो तुटणार नाही. कोणताही समाज असला तरी त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो. मराठा समाज कधी नव्हे तेवढा आता एकत्र आलाय आणि इतक्या ताकदीने एकवटला आहे की,सरकारसह बऱ्याच लोकांना ते पाहवत नाही. मराठा समाजाची एकी तुटू शकत नाही. तुम्ही कितीही नोटीस द्या.तुम्ही आंदोलन दडपू शकत नाही. तुम्ही दडपण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही केला तर आम्ही मागे हटणार नाही. शांततेत आंदोलन करू पण आरक्षण आम्ही घेणारच असं त्यांनी सांगितले. 

तसेच आरक्षण हा मुद्दा आग्रहाने चर्चेत आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने दिलेला शब्द पाळावा. काहीही केले तरी मराठे आरक्षण घेणारच आहे. पाठीमागे आंदोलन दडपण्याचा जो प्रयोग सरकारने केला त्या भानगडीत आता पडू नये अशी माझी सरकारला विनंती आहे. आम्ही मुंबईत यावे हे जाहीर केले नाही. मग नोटीस कशाला दिली? जर सरकारची इच्छा असेल तर आम्ही येतो. मी प्रामाणिकपणे सांगतोय, नोटीस देऊ नका. मराठा समाज सरकारच्या शब्दाचा सन्मान करतोय मग त्यांना खवळायला लावू नका असंही जरांगेंनी म्हटलं. 

दरम्यान, ५४ लाख नोंदी नव्याने आढळल्या आहेत. सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. आज आणि उद्याचे २ दिवस वाट पाहणार आहे. अजूनही सरकारकडून अपेक्षा आहे. उभं आयुष्य मराठ्यांचे आंदोलनात गेले आहे. लोकशाहीने आम्हाला तो अधिकार दिला आहे. मराठ्यांची लेकरं अडचणीत आहेत. त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभे राहा. तरुण आरक्षण मागतायेत पण काही नसताना त्यांना नोटिस पाठवली जातेय. सामान्य मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरला आहे. सर्व पक्षाच्या मराठा आमदारांनी आमच्या पाठिशी उभं राहावे. जर नाही तर तुम्हाला आमच्या दारात पुन्हा यायचे आहे. आम्ही आरक्षण घेणारच हे ठासून सांगतो असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Government has only time till 24 December, we will take maratha reservation; Manoj Jarange patil ultimatum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.