व्यापा-यांपुढे सरकार नरमले, आडत बंदीला तात्पुरती स्थगिती
By admin | Published: December 22, 2014 12:50 PM2014-12-22T12:50:33+5:302014-12-22T12:55:58+5:30
आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिल्याची घोषणा राज्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २२ - आडत बंदीविरोधात व्यापा-यांनी बंदचे हत्यार उपसल्याने राज्य सरकारने नरमाईची भूमिका घेतली आहे. शेतक-यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिल्याची घोषणा राज्याचे सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळात केली आहे.
तीन दिवसांपूर्वी राज्य सरकारने आडत बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी या निर्णयाची घोषणाही केली होती. मात्र या निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापा-यांनी विरोध दर्शवला होता. नाशिक व अन्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापा-यांनी आज बंदही पुकारला होता. व्यापा-यांच्या वाढत्या विरोधापुढे राज्य सरकारने सोमवारी नमती भूमिका घेतली. आडत बंदीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देत असून १५ दिवस अडते व शेतक-यांसोबत बैठक घेऊ अशी माहिती चंद्रकात पाटील यांनी विधानसभेत दिली.
आडत म्हणजे काय ?
बाजारसमितीमध्ये शेतक-यांकडून आडतदारांकडे माल आणला जातो. या मालाची विक्री झाल्यावर शेतक-यांच्या पट्टीतून आडत कपात केली जाते. पणन संचालकांनी या पद्धतीमध्ये बदल केला होता. नवीन पद्धतीनुसार आडतदारांनी शेतक-यांकडून आडत कपात न करता खरेदीदाराकडून एक टक्के आडत कपात करावी असा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे शेतक-यांचे हित झाले असते. तर यामुळे बाजारसमित्यांमध्ये व्यापार करणे अशक्य होईल असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.