सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय
By admin | Published: May 29, 2017 03:22 AM2017-05-29T03:22:56+5:302017-05-29T03:22:56+5:30
महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रापुढे पाणी आणि वाढते नागरीकरण हे दोन मुख्य जटील प्रश्न आहेत. कचरा, पाणी हे मूलभूत प्र्रश्न सोडविण्याऐवजी स्मार्ट सिटीच्या भंपकपणावर सरकार भर देते आहे. वाढत्या नागरिकरणामुळे कचऱ्याचा प्र्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी सरकार वाट चुकल्यासारखं वागायला लागलंय, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केली.
बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार पाणलोट क्षेत्र विकासाचे प्रणेते विजय बोराडे, ज्येष्ठ कीर्तनकारक हभप रामदासमहाराज, मृदाशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. मन्ना यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘पाश्चात्य देशांचे अनुकरून करून स्मार्ट सिटीची संकल्पना आणण्यात आली आहे. या संकल्पनेला मी सुरुवातीपासून विरोध केला आहे. पाश्चात्य देशांमध्ये विकसित शहरांना तंत्रज्ञानावर आधारीत आणखी चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट सिटीची संकल्पना राबविण्यात येऊ लागली. आपल्याकडे कचरा, पाणी अशा मूलभूत समस्या सुटलेल्या नसताना स्मार्ट सिटीची स्पर्धा राबवून शहर स्मार्ट करण्याच्या मागे धावले जात आहे.’
साखळी सिमेंटचे बंधारे बांधण्याची संकल्पना जलयुक्त ग्राम योजना या नावाने आमच्या सरकारने सुरू केली. मात्र याच योजनेचे नाव ‘जलयुक्त शिवार योजना’ असे करून तिचे मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केले जात आहे. त्यामध्ये अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरण केले जात आहे. जंगलतोड मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अशी टीका चव्हाण त्यांनी केली.
रामदास महाजन म्हणाले, ‘संत सांप्रदायामध्ये लाडूचा व झाडूचा विचार सांगणारे असे दोन पंथ आहेत. गाडगेमहाराज आणि कैकाडीमहाराज यांनी गावागावांमधून प्रबोधनाचा विचार पुढे नेला. प्रबोधनाचे विचार मांडणाऱ्या सर्व कीर्तनकारांना एकत्र आणण्यासाठी संत भारती ही संकल्पना बाळासाहेब भारदे यांनी मांडली होती. मात्र ती काही कारणाने पूर्णत्वास जाऊ शकली नाही. आगामी काळात ती पुढे नेण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घ्यावा.’ विजय बोराडे म्हणाले, ‘जलयुक्त शिवार या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास हा शब्दच गायब झाला आहे. मृदासंधारणावर आधारीत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे आवश्यक असताना जलयुक्त शिवार योजनेत अशास्त्रीय पद्धतीने खोलीकरणावर भर दिला जात आहे.’’
काश्मीरमधील परिस्थिती गंभीर
श्रीनगरचा काँग्रेस पक्षाचा प्रभारी म्हणून मी काम केले आहे. पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी मी काल श्रीनगरला गेलो होतो. पूर्वीच्या तुलनेत कश्मीरमधील परिस्थिती खूपच गंभीर बनल्याचे चित्र दिसून आले. शाळकरी मुले हातात दगड उचलून फेकत आहेत. नोटा बदलल्या म्हणजे दहशतवाद संपेल, कश्मीरचा प्रश्न सुटेल या भ्रमात मोदी सरकार वावरत होते, ते खोटे ठरले आहे अशी जोरदार टिका पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केली.