शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:57 AM2024-09-19T05:57:40+5:302024-09-19T05:57:57+5:30
सोलरचा वापर करा, असे सुचविण्यात येत होते. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी आणि आयुर्वेद रुग्णालयातील विजेचा खर्च वाढत आहे. तो कमी करण्यासाठी रुग्णालयावर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर सोलार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सोलरचा वापर करा, असे सुचविण्यात येत होते. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पारंपरिक ऊर्जा स्रोताऐवजी सौर ऊर्जेचा वापर केल्याने विजेचा मोठा खर्च कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाची राज्यात २५ वैद्यकीय, तीन दंत, सहा आयुर्वेद आणि एक होमिओपॅथी कॉलेज आहे. या महाविद्यालयांना मोठ्या प्रमाणावर विजेचा खर्च येतो. शासकीय रुग्णालये असल्यामुळे ३६५ दिवस २४ तास रुग्णालये गरीब रुग्णांना सेवा देत असतात.
सौर ऊर्जेवर आधारित संयंत्राच्या उभारणीसाठी केंद्र शासनाचे नियम व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांच्या विहित तांत्रिक मोजमापे (टेक्निकल स्पेसिफिकेशन) व मानांकनानुसार करण्यात यावी. प्रकल्प राबविताना शासनावर आर्थिक भार येणार नाही याची वैद्यकीय आयुक्तांनी खातरजमा करावी, असे विभागाने म्हटले होते.
आयुक्तांना अधिकार
रुग्णालय इमारतीच्या गच्चीवर ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याने तांत्रिक बाजू तपासून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निविदा प्रक्रियेत तसेच कराराच्या कालावधीत नवीन संस्थांचा अंतर्भाव करणे किंवा संस्था कमी करण्याचे अधिकार शासन मान्यतेने आयुक्तांना असतील.
वीज बिल कमी होणार
वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसासार, पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यामुळे आतापर्यंत येणारा मोठा खर्च सौर ऊर्जेमुळे कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्वीच राबविणे गरजेचे होते.