शासकीय रुग्णालये अग्निशामक उपकरणाविना
By admin | Published: July 7, 2014 11:38 PM2014-07-07T23:38:27+5:302014-07-07T23:38:27+5:30
जिल्हाभरातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविण्यात आली नाही.
कारंजालाड: जिल्ह्यातील कारंजा,मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव ,रिसोड, कामरगाव , अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयांप्रमाणेच जिल्हाभरातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आग प्रतिबंधात्मक उपकरणे बसविण्यात आली नाही. काही ठिकाणी अशी उपकरणे बसविले होती.मात्र , ती उपकरणे अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत.राज्यात अनेक ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच स्थिती असल्याची माहिती आहे.त्यामुळे आरोग्य विभाग रुग्णांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे ते दिसून येते.
ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक अरोग्य केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नागरिक उपचारासाठी येतात.त्यांना तेथे उपचार, शस्त्रक्रिया आदींसाठी भरती व्हावे लागते.त्यामुळे ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अग्निशामक उपकरणे सज्ज असणे रुग्ण व आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरते.परंतु, याकडे आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.कारंजा ग्रामीण रुग्णालयात कारंजा, मानोरा, मंगरुळपीर तालुक्यातून बरेच रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णालयात नेहमीकरीता ३0 रुग्ण भरती राहतात.तसेच दररोज ओ.पी.डी.मध्ये ३0 ते ४0 रुग्ण उपचार घेतात. रुग्णालयात शासकीय व निमशासकीय ६0 कर्मचारी कामावर असतात. यासोबतच रुग्णाचे नातेवाईक २0 पेक्षा जास्त उपस्थित असतात.
येथे ७ जुलै रोजी पाहणी केली असता कारंजा ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे नसल्याचे आढळून आले.रिसोड ,अनसिंग,मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे नाहीत.कामरगाव व मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अग्निशामक उपकरणे आहेत.परंतु, ती धुळ खात पडून आहेत. जिल्ह्यात २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.पण ,त्यापैकी कुठेही अग्निशामक उपकरणे बसविलेली नाहीत. या रुग्णालयांमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कसलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
कारंजा ग्रामीण रुग्णालयात एका वर्षापुर्वी शस्त्रक्रिया विभागात आग लागली होती. यामध्ये १५ ते २0 हजार रुपयाचे नुकसान झाले होते. मात्र ग्रामीण रुग्णालयात लागलेल्या आगीच्या ठिकाणी गॅस सिलेंडर व ऑक्सीजनचेही सिलेंडर ठेवलेले होते. मात्र, कर्मचार्यांच्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला.तसे शासनाने सर्वच शासकीय कार्यालयांचे फायर ऑडीट करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे रुग्ण व आरोग्य कर्मचारी असुरक्षित आहेत.