सरकार वर्षाचे झाले तरी ‘सेन्सॉर बोर्डा’कडे दुर्लक्ष; पुनर्रचना करण्यास मुहूर्त सापडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:28 AM2020-12-02T03:28:32+5:302020-12-02T03:28:51+5:30
नवीन नाटक लिहिल्यानंतर त्याची संहिता मंडळाकडे पाठविली जाते. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे तपासल्यानंतर, नाटक रंगभूमीवर सादर करण्याच्या योग्यतेचे असल्याचे प्रमाणपत्र मंडळाकडून मिळाल्यावरच तशी परवानगी मिळते.
पुणे : नाट्यगृहे सुरू झाल्यामुळे नवीन नाटके रंगभूमीवर आणण्यासाठी कलाकारांच्या तालमी चालू झाल्या आहेत. मायबाप रसिकांच्या सेवेसाठी रंगभूमी सज्ज झाली आहे. मात्र महाआघाडी सरकार अस्तित्वात येऊन एक वर्ष उलटले तरी, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर बोर्ड) पुनर्रचना करण्यास अद्यापही मुहूर्त लागलेला नाही.
नवीन नाटक लिहिल्यानंतर त्याची संहिता मंडळाकडे पाठविली जाते. त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे तपासल्यानंतर, नाटक रंगभूमीवर सादर करण्याच्या योग्यतेचे असल्याचे प्रमाणपत्र मंडळाकडून मिळाल्यावरच तशी परवानगी मिळते. या मंडळाची पुनर्रचनाच न झाल्याने नवीन नाट्यसंहिता ‘सेन्सॉर’च्या प्रतीक्षेत अडकल्या आहेत. नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर तत्कालीन सरकारच्या कार्यकाळातील समित्या, मंडळे बरखास्त केली जातात आणि त्यांची पुनर्रचना केली जाते. मात्र वर्ष उलटून गेले तरी भाषा, साहित्य आणि नाट्यविषयक संस्था, मंडळे, समित्यांची पुनर्रचना करण्यास सरकारला सवड मिळालेली नाही. कोरोनालॉकडाऊन काळात नाट्यगृहे बंद होती. त्यामुळे नवीन नाटके रंगमंचावर येण्याची सूतराम शक्यता नव्हती.
माझ्या कारकिर्दीत ज्या काही नाट्यसंहिता आल्या त्या सेन्सॉर करण्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र शेवटच्या टप्प्यातील नाट्य संहिता प्रलंबित असण्याची शक्यता आहे. रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना लवकरात लवकर व्हायला हवी. -अरूण नलावडे, माजी अध्यक्ष रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ
रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना न झाल्यामुळे प्रायोगिक, व्यावसायिक, बालनाट्य, स्पर्धात्मक एकांकिका अशा जवळपास ३०० ते ४०० संहिता पडून आहेत. -सुनील महाजन, अध्यक्ष, कोथरूड नाट्य परिषद