समन्यायी पाण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा
By admin | Published: August 14, 2016 02:15 AM2016-08-14T02:15:18+5:302016-08-14T02:15:18+5:30
यंदा तुलनेने चांगला पाऊस झाला, त्याचे समाधान आहे. गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले. तरीही मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर
नांदेड : यंदा तुलनेने चांगला पाऊस झाला, त्याचे समाधान आहे. गोदावरी नदीला काही भागात पूर आला म्हणून जायकवाडी धरण ६० टक्क्यांवर भरले. तरीही मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांवर असलेले पाणी टंचाईचे संकट कायमचे दूर करण्यासाठी समन्यायी पाणी वाटप झाले पाहिजे. त्याकरिता राज्य सरकारने विधायक हस्तक्षेप करावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथे मांडली.
‘लोकमत’आयोजित नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ५० प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्यात ते म्हणाले, जायकवाडीच्या वरच्या भागात पूर आला. त्यानंतर मराठवाड्याकडे पाणी आले. एकीकडे वरच्या भागात पाणी अडविले जाते तर मराठवाड्यातून पुढे जाणारे पाणी बाभळीसारख्या बंधाऱ्यातही थांबविता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे २९ आॅक्टोबरपर्यंत दरवाजे बंद करता येत नाहीत. परिणामी आलेले पाणी वाहून जाते. याच बंधाऱ्यासाठी महाराष्ट्र व आंध्र प्रदेशमध्ये तंटा झाला.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत
गेले. आता पुन्हा मराठवाड्याच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले पाहिजे. एकूणच सरकारने समन्यायी पाणी वाटपासाठी योग्यवेळी हस्तक्षेप करावा अन्यथा पाणीप्रश्न पेटेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठवाड्यातील काही मोठे प्रकल्प अद्यापही भरलेले नाहीत. विष्णूपुरीत पाणी आले असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात दीर्घकाळ पूर्तता होणार नाही. त्यामुळे जिल्हा- शहरांसाठी पर्यायी पाणी पुरवठ्याच्या योजना आखल्या तरच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
सध्या देशात स्टार्टअप इंडिया, स्टॅन्डअप इंडिया सुरू आहे, परंतु हे सर्व काही मोजक्या व मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित आहे. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारला सवडच नाही. बँका जवळ उभे करीत नाहीत. कर्जाचे पुनर्गठन होत नाही, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
लोकांची नाडी
जाणणारे ‘लोकमत’
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या वेदना पाहिल्या. विवंचनेला वैतागून ज्यांनी आत्महत्येसारखा शेवटचा मार्ग पत्करला. त्यांची व त्यांच्या कुटंबीयांची निश्चितच आठवण होते, असे नमूद करीत खा. चव्हाण म्हणाले, दुष्काळाचे दुष्टचक्र भेदून ज्या शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग केले त्यांचा ‘लोकमत’ने सन्मान केला. त्यामुळे मनोबल उंचावेल. प्रेरणा मिळेल, इतर शेतकऱ्यांना दिशा मिळेल. समाजाची नाडी जाणणारे ‘लोकमत’च हे करु शकते, असेही चव्हाण म्हणाले.