Uddhav Thackeray: न्यायप्रविष्ट प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप गंभीर विषय, थातूरमातूर उत्तर नको; उद्धव ठाकरे कडाडले!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 06:06 PM2022-12-20T18:06:14+5:302022-12-20T18:07:39+5:30
राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली.
नागपूर-
राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणावरुन आज विरोधकांनी विधान परिषेदत शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपूर न्यास प्रकरणावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारकडून हस्तक्षेप केला गेला असं कोर्टाच्या अमायकस क्युरीनंच (न्यायालयाचे मित्र) म्हटलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये मंत्र्यानं हस्तक्षेप करणं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणाची फडणवीसांनी ज्या सहजतेनं लिलया कथानक सभागृहात सांगितलं त्यानुसार जर विषय इतका सोपा होता तर तो इतके वर्ष का चालला? अमायकर क्युरी जर म्हणत असेल की सरकारचा हस्तक्षेप झाला होता तर मग याचा अर्थ काय? नुसतं ही एक केस म्हणून याकडे पाहणं चुकीचं आहे. विषय न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये सरकारकडून केल्या गेलेल्या हस्तक्षेपाचा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी...
नागपूर न्यास जमीन विक्री प्रकरणासंबंधीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. "मी त्यावेळी मुख्यमंत्री असलो तरी घेण्यात आलेला निर्णय नगरविकास खात्याअंतर्गत तत्कालीन मंत्र्यांनी घेतला होता. नगरविकास खात्याच्या अखत्यारित तो निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळीचे नगरविकास मंत्री आताही त्याच खात्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. नुसतं थातूरमातूर उत्तर देऊन चालणार नाही. न्यायप्रविष्ट प्रकरणात तुम्ही हस्तक्षेप केलात हा मुद्दा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हा बालिशपणा
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाकडून सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला गेला आहे. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. "ग्रामपंयाचत निवडणुकीत स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात. स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी विविध आघाड्या होत असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांचा विजय होत असतो. तिथं पक्षाचा काही थेट संबंध नसतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमचा पक्ष पहिला, तुमचा दुसरा हे असं करणं म्हणजे बालिशपणा आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम