सरकारी नोकरीची बोगस जाहिरात व्हॉट्सअॅपवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:16 AM2018-02-04T01:16:55+5:302018-02-04T01:17:03+5:30
एका शासन निर्णयाचा संदर्भ देत मोठ्या प्रमाणात शासकीय पदांची भरती करण्यात येणार असल्याचे संदेश सध्या व्हॉट्स अॅपवर फिरत असून अशी कोणतीही भरती केली जाणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी स्पष्ट केले.
मुंबई : एका शासन निर्णयाचा संदर्भ देत मोठ्या प्रमाणात शासकीय पदांची भरती करण्यात येणार असल्याचे संदेश सध्या व्हॉट्स अॅपवर फिरत असून अशी कोणतीही भरती केली जाणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी स्पष्ट केले.
१० जानेवारी २०१८ च्या एका शासन निर्णयाचा आधार घेत पदभरतीचा संदेश फिरवला जात आहे. अशी कोणतीही जाहिरात विभागामार्फत देण्यात आलेली नाही. तरी अशा बोगस जाहिरातीपासून सावध राहावे आणि आपली फसगत होणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
विविध व्हॉट्स अॅप ग्रुपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या नावाची गट-ड वर्गातीला लिपिक-३४, सहायक रोखपाल २२, रोखपाल १०, लेखापाल ६, गोपनीय लिपिक-१९, देयक लेखापाल १४, शिपाई ५८, वाहनचालक-३४, नाईक-३१ अशी २२८ पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात फिरत आहे. प्रत्यक्षात ही जाहिरात बोगस असून, सामान्य प्रशासन विभागामार्फत अशा प्रकारे पदभरतीसाठी कोणतीही जाहिरात दिलेली नाही. जाहिरातीमधील बहुतांशी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. ही भरतीची जाहिरात नसून नियमित प्रशासकीय बाबीसंबंधीचा निर्णय आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.