मृत अधिकाऱ्यांच्या वारसालाही नोकरी; राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 07:27 AM2021-08-27T07:27:48+5:302021-08-27T07:28:28+5:30
गट क आणि ड च्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी दिली जात होती. आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबतही घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय अधिकाऱ्याच्या (गट अ आणि ब) कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गट क आणि ड च्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी दिली जात होती. आता हा निर्णय अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांबाबतही घेण्यात आला. कोरोनाकाळात अनेक अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला पण शासनाचा नियम नसल्याने त्यांच्या कुटुंबातील कोणालाही अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकत नव्हती. अधिकाऱ्यांच्या कुटुंबासही अनुकंपा तत्त्वाचा लाभ द्यावा, अशी राजपत्रित अधिकारी संघटनेची जुनी मागणी होती. गट ब आणि क या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासंदर्भातील धोरणही शासनाने गुरुवारी जाहीर केले.
२००१ पर्यंत राज्यातील अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जात होती. मात्र राज्य सरकारवर आर्थिक भार येतो, असे कारण देऊन सरकारने ते नंतर बंद केले. आजच्या निर्णयाने अधिकारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
- ग. दि. कुलथे, नेते,
राजपत्रित अधिकारी महासंघ
अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी बहुतेकांना गट क किंवा ड मध्ये नोकरी मिळेल. म्हणजे या दोन गटांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांवर आजच्या निर्णयाने गदा आणली आहे. सध्या ही प्रतीक्षा यादी १३ हजार इतकी आहे. त्यांना नोकरी मिळेपर्यंत अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही नोकरी मिळणार नाही.
- विश्वास काटकर,
सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना