आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना सरकारी नोकरी - दिवाकर रावते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 07:05 PM2017-09-13T19:05:33+5:302017-09-13T21:01:44+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आता सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज जाहीर केला आहे.
मुंबई, दि. 13 - आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना आता सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं जाहीर केला आहे. प्राधान्यानं सरकार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलांना नोकरी देणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला आता सरकारी नोकरीचा लाभ मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेने ही मागणी केली होती. ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने क वर्गात सरकारी नोकरी देण्यात येईल, परिवहनच नाही सर्व विभागात त्यांना संधी दिली जाणार असल्याची घोषणा दिवाकर रावते यांनी केली.
फायनन्शियल सेंटर बीकेसीतच होणार : दिवाकर रावते
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातची शान वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील इंटरनॅशनल फायनान्स सर्विस सेंटरचा बळी जाणार असल्याचं दिसत आहे. मुंबईतील बीकेसीत हे सेंटर होणार आहे. पण मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी बीकेसीतील 0.9 हेक्टर जागा द्यावी लागणार आहे. मात्र बुलेट ट्रेन आली तरी फायनन्शियल सेंटर होणारच, असं दिवाकर रावते यांनी यावेळी सांगितले.
बीकेसीतच हे फायनन्शियल सेंटर होईल, त्यासाठी जेवढी जागा बुलेट ट्रेनसाठी द्यावी लागेल, त्याचे पैसे घेतले जातील. त्या पैशातून फायनन्शियल सेंटरची इमारत बांधली जाईल, असेही ते म्हणाले.