आठ खेळाडूंना शासकीय नोकरी
By admin | Published: November 7, 2016 06:50 AM2016-11-07T06:50:45+5:302016-11-07T06:50:45+5:30
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करीत राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
मुंबई : विविध खेळांमध्ये राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करीत राज्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुणवंत खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार हा प्रस्ताव तयार केला होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मान्यता दिली आहे.
खेळाडू आणि शासकीय पद
संदीप यादव (प्रशिक्षक, क्रीडा विभाग), कविता राऊत (आदिवासी विकास विभाग), ओंकार ओतारी (तहसीलदार, महसूल विभाग), अजिंक्य दुधारे (प्रशिक्षक, क्रीडा विभाग), पूजा घाटकर (विक्रीकर निरीक्षक, विक्रीकर विभाग), नितीन मदने (तहसीलदार, महसूल विभाग), किशोरी शिंदे ( नगरविकास विभाग) आणि नीतू इंगोले( क्रीडा विभाग) यांचा शासकीय सेवेत समावेश करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
ललिता बाबरला डावलले?
रिओ आॅलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी करणारी साताऱ्याची धावपटू ललिता बाबरचे नाव या यादीत
नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे, ललिताला क्लास वन अधिकारीपदी नोकरी देऊ, असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
आॅलिम्पिकमध्ये ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात
तिने अंतिम फेरी गाठून उत्कृष्ठ कामगिरीची नोंद केली आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही
गावच्या ललिताने मोठा संघर्ष करत खडतर प्रवास केला आहे. याबाबत लोकमतने ललिताशी संपर्क साधला असता ती म्हणाली, स्वत: मुख्यमंत्र्यांनी मला शासकीय सेवेबाबत आश्वासन दिले आहे. कदाचित, ही पहिली यादी असून पुढच्या यादीत आपले नाव असेल अशी मला खात्री आहे.