अकोला जिल्ह्यातील सहा तालुक्यात शासकीय ज्वारी खरेदी रखडली
By admin | Published: November 16, 2016 05:18 PM2016-11-16T17:18:44+5:302016-11-16T17:18:44+5:30
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात हमी दराने ज्वारी खरेदीसाठी ७५ हजार पोत्यांचा बारदाना उपलब्ध आहे
संतोष येलकर
अकोला, दि. १६ : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात हमी दराने ज्वारी खरेदीसाठी ७५ हजार पोत्यांचा बारदाना उपलब्ध आहे; मात्र ज्वारी खरेदीसाठी शासकीय धान्य गोदामांमध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यात शासकीय ज्वार खरेदीची प्रक्रिया रखडली आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामातील हमी दराने ज्वार खरेदी १ नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात हमी दराने शासकीय ज्वारी खरेदी सुरु करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात सातही तालुक्यात ज्वारी खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले. त्यामध्ये अकोला तालुक्यातील रिधोरा येथील या एकमेव खरेदी केंद्रावर गत १० नोव्हेंबरपासून ज्वार खरेदी सुरु करण्यात आली; मात्र जिल्ह्यातील आकोट, बाळापूर, बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सहा तालुक्यात अद्यापही ज्वार खरेदी केंद्र सुरु करण्यात आले नाही.
जिल्ह्यात शासकीय ज्वार खरेदीसाठी ७५ हजार पोत्यांचा बारदाना जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहे; परंतू जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा,बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर येथील शासकीय धान्य गोदामांमध्ये ज्वार खरेदीसाठी जागा उपलब्ध नसल्याने, जिल्ह्यातील सहा तालुक्यात १६ नोव्हेंबरपर्यंत शासकीय ज्वार खरेदी सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे शासकीय ज्वार खरेदीसाठी पोत्यांचा बारदाना उपलब्ध असला तरी, ज्वारी खरेदीसाठी जिल्ह्यातील सहा गोदांमांमध्ये ज्वारी खरेदीसाठी आणि साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याने,शासकीय ज्वार खरेदीची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे शासकीय ज्वार खरेदीसाठी जागेचा गुंता केव्हा सुटणार आणि हमी दराने ज्वार खरेदी केव्हा सुरु होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.